कऱ्हाडला साडेसात कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:24+5:302021-03-24T04:37:24+5:30
कऱ्हाड : शहरात युवा पिढीसाठी नावीण्यपूर्ण कामे सुचवून त्याचे प्रस्ताव १८ जानेवारीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लोकशाही आघाडीने ...

कऱ्हाडला साडेसात कोटींचा निधी मंजूर
कऱ्हाड : शहरात युवा पिढीसाठी नावीण्यपूर्ण कामे सुचवून त्याचे प्रस्ताव १८ जानेवारीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लोकशाही आघाडीने दिले होते. त्याचा पाठपुरावा केला. शहराच्या वैभवात भर टाकणारी सात नवीन विकासकामे मंजूर करून आणली आहेत. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नावीन्यपूर्ण योजनेतून ७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे,’ अशी माहिती आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा नदीवरील नवीन कृष्णा पुलाच्या परिसरात खुल्या जागेत कचरा व झुडपे वाढत असल्याने प्रवेशद्वारच बकाल दिसत आहे. आपल्या प्रभागाचे सौंदर्यीकरण होण्यासाठी, सुशोभीकरणासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव तयार केला. प्रस्तावात पुलाच्या रुक्मिणीनगरकडील पूर्व भागात संरक्षक भिंत होणार आहे. खुल्या जागेत लॉन, म्युरल्स आणि वॉकिंग ट्रक होणार आहे. नदीच्या बाजूकडून भराव करून ही जागा भरून घेतली आहे. या कामासाठी नगरविकास खात्याकडून ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागरिकांना फिरण्यासाठी हे नवे ठिकाण होणार आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात कलाकारांना वाव देण्यासाठी कलादालनाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी विविध कलाकारांची प्रदर्शने, चित्रप्रदर्शने, कार्यशाळा व अन्य कार्यक्रम व्हावेत, असा हेतू होता. मात्र तशा सुविधा कलादालनात नव्हत्या. मोठ्या शहरातील आर्ट गॅलरींना भेटी देऊन आवश्यक सुविधांची माहिती घेत प्रस्ताव तयार केला. यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरात वाहनांच्या पार्किंगची समस्या उग्र होत आहे. यावर उपाय म्हणून बुधवार पेठेत भाजी मंडईत सोमेश्वर मंदिराशेजारी आरक्षण क्रमांक २६ मध्ये शंभर वाहनांचे पार्किंग होईल, अशी मेकॅनिकल पार्किंगची इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. श्री हॉस्पिटलसमोर आरक्षण क्रमांक ५३ या जागेस कंपाऊंड करून इनडोअर गेम्सची सुविधा करण्यात येणार आहे. टेनिस कोर्ट, स्केटिंग रिंग, इनडोअर आर्चरी, शूटिंग रेज या क्रीडा सुविधा करण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शुक्रवार पेठेत रंगारवेस येथे महादेव मंदिराशेजारी घाट निर्मिती पन्नास लाख तर वाखाण भागात संत सखूनगरमधील बगीचासाठी तीस लाख मंजूर झाले आहेत. या निधीसाठी पाठपुरावा करताना लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, जयंत पाटील यांची मोठी मदत झाल्याचे सौरभ पाटील यांनी म्हटले आहे.
फोटो
२३सौरभ पाटील०१