कोयनेत ७४ टीएमसी पाणीसाठा
By Admin | Updated: August 3, 2014 01:52 IST2014-08-03T01:16:30+5:302014-08-03T01:52:45+5:30
वीरमधून विसर्ग थांबविला : पावसाचा जोर मंदावला

कोयनेत ७४ टीएमसी पाणीसाठा
सातारा/ कोयनानगर / पाटण : गेले काही दिवस सुरू असलेली संततधार शनिवारी थोडी थांबली. काही भागांत पावसाचा जोर थांबला असल्यामुळे धरणातील येवा कमी झाला असून, परिणामी पाणीसाठाही कमी वेगाने वाढत आहे. कोयना धरणातील येवा ४० हजार ६२ क्युसेक इतका असून, शनिवारी सकाळी पाच वाजता ७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. वीर धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे. अन्य धरणांतील पाण्याचा विसर्गही कमी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत जोरदार सरी कोसळत आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार संततधार होत असल्यामुळे पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. मात्र, शनिवारी पावसाचा जोर अचानकपणे मंदावला आहे. उरमोडी, तारळी, वीर धरण लाभक्षेत्रांत जोरदर सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत होता. धरणाच्या दरवाजातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे उरमोडी आणि तारळी नदी पात्राच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धोम धरणाची पाणीसाठवण क्षमता १३.५० टीएमसी इतकी असून, धरणात आजमितीस ९.४७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. कण्हेर धरणात ९.१० टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, धरण भरण्यास अजून एक टीएमसी पाणी हवे आहे. उरमोडी धरणातून तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू असून, धरणात ८.७५ टीएमसी इतके पाणी आहे. धरणाची एकूण क्षमता ९.८० टीएमसी इतकी आहे.
धोम-बलकवडी धरणाची क्षमता ४.०८ टीएमसी असून, धरणात ३.५४ टीएमसी पाणीसाठा आहे. तारळी धरणात ४.८९ टीएमसी पाणीसाठा असून, क्षमता ५.८५ टीएमसी आहे. धरणातून २९४६ क्युसेक विसर्ग तारळी नदीपात्रात होत आहे. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून, धरणात आजमितीस ७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही २६.२५ टीएमसी इतके पाणी हवे आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी धरणातील येवा चांगला आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढत चालला आहे. पावसाचा जोर वाढला तरी बहुधा याच महिन्यात धरण भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ ते सांयकाळी पाच या वेळेत कोयना ११ (३२१९), नवजा ६१ (३८५१) तर महाबळेश्वर येथे १२ (३०१८) मिमी पावसाची नोंद झाली.
सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शनिवारी पहाटे आणि शुक्रवारी दिवसभरात १३३.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक ६८.८ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली. जिल्ह्यात आजअखेर एकूण ७५८१.३ मिमी पावसाची नोंद झाली असूून, तालुकानिहाय सरासरी ६८९.२ मिमी इतकी आहे. प्रतिनिधी)