जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७०३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:05+5:302021-04-04T04:41:05+5:30
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने गेल्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी चोवीस तासात तब्बल ७०३ नवे कोरोनाबाधित ...

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७०३ रुग्ण
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने गेल्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी चोवीस तासात तब्बल ७०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा १ हजार ९१२वर पोहोचला असून, बाधितांची संख्या ६७ हजार ४९४ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला असून, जिल्हावासियांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावर प्रचंड ताण वाढू लागला आहे. शुक्रवारी जिल्ह्यामध्ये २ हजार ३४९ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७०३ जण बाधित आढळून आले आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हिवघरवाडी, (ता. जावळी) येथील ४५ वर्षीय पुरुष व शिवतर येतील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाची पळापळ सुरु झाली आहे. प्रशासनाकडून वारंवार योग्य सामाजिक अंतर राखावे तसेच मास्कचा वापर करण्याबाबत वारंवार सांगितले जात आहे. मास्क न वापरणारे तसेच गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे, तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र असल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागलेला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६७ हजार ४९४ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा १ हजार ९१२वर पाेहोचला आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ६० हजार ५७५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या ५ हजार ७ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
चौकट : आयसीयू बेड मिळेनात
अनेक रुग्ण कोरोनाबाधित झाल्याने अत्यवस्थ झाले आहेत, त्यांच्यावर कोविड जम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या वाढू लागल्याने जम्बो हॉस्पिटलमधील बेडदेखील कमी पडू लागले आहेत. आयसीयूमध्ये बेड मिळावेत, यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
चौकट..
पोलीस दलातील १० अधिकारी-कर्मचारी बाधित
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असून, कोरोनाने सातारा पोलीस दलात शिरकाव केला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी आशा दहाजणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यासाठी पुन्हा पोलीस कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे.