७ बिनविरोध; दिग्गजांची बंडखोरी
By Admin | Updated: April 25, 2015 00:01 IST2015-04-24T23:57:07+5:302015-04-25T00:01:50+5:30
बाळासाहेबांनी थोपटले दंड; १४ जागांसाठी ३१ उमेदवार रामराजे-शशिकांत शिंदेंसाठी निवडणूक अटळ

७ बिनविरोध; दिग्गजांची बंडखोरी
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, अनिल देसाई व राजेंद्र राजपुरे हे सात नेते बिनविरोध निवडून आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. मात्र, राष्ट्रवादीचेच आमदार बाळासाहेब पाटील, संचालक लालासाहेब शिंदे व बकाजीराव पाटील यांनी पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकाविला आहे. तसेच, १४ जागांसाठी ३१ उमेदवार मैदानात उतरले आहेत.
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. प्रभाकर घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी कमराबंद चर्चा झाली.
कृषी प्रक्रिया मतदारसंघात दादाराजे खर्डेकर यांना याठिकाणी उमेदवारी देण्याचे ठरविण्यात आल्यानंतर नाराज झालेले आ. बाळासाहेब पाटील बैठकीतून तडकाफडकी बाहेर निघून गेले. दोघांनीही लढण्याचे मनसुबे पत्रकारांशी बोलून दाखविले.
उदयनराजेंचा प्रस्ताव फेटाळला
जिल्हा बँकेसाठी तीन जागांची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडे केली होती. यासंदर्भात शुक्रवारी सकाळी नाना शिंदे व सुनील सावंत या उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी बँकेत जाऊन लक्ष्मणतात्यांशी चर्चा केली. पण ते शक्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुनील काटकर यांनीही याबाबत शशिकांत शिंदे यांच्याशी बोलणी केली. मात्र, तीन जागांऐवजी उदयनराजेंनाच पॅनेलमध्ये घेतले जाणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीने त्यांचा प्रस्ताव फेटाळला.
रामराजेंच्या सूचनेनुसार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधातील ‘महानंद’ चे संचालक डी. के. पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. त्यामुळे उदयनराजे बिनविरोध ठरले. औद्योगिक विणकरमधील १0 अर्जांपैकी ९ अर्ज काढून घेण्यात आल्याने अनिल देसाई बिनविरोध ठरले.
बैठकीतील चर्चेनंतर सात अर्ज तत्काळ काढले गेले; पण उदयनराजे गटाचे नितीन राजेशिर्के व अजय धायगुडे पाटील यांचे अर्ज काढून घेण्यासाठी देसाईंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना पळापळ करावी लागली. दरम्यान, उदयनराजे यांना मानणाऱ्या पाच उमेदवारांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे.