६८ ठिकाणी राजे गट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 22:25 IST2015-08-06T22:25:13+5:302015-08-06T22:25:13+5:30
फलटण : विरोधकांचीही अनेक ठिकाणी मुसंडी

६८ ठिकाणी राजे गट!
फलटण : तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेगटाने वर्चस्व कायम राखले आहे. तर विरोधकांनीही अनपेक्षित मुसंडी मारत अनेक ठिकाणी जागा जिंकल्या. अनेक ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या साखरवाडीत राजेगटाने सत्ता मिळविली आहे. राजेगटाने ६८ तर विरोधकांनी १८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन गुरुवारी मतमोजणी करण्यात आली. नवीन शासकीय गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला.साखरवाडी व कोळकी ग्रामपंचायतींच्या निवडणुका खरोखरच चुरशीच्या झाल्या. साखरवाडीत न्यू फलटण शुगर वर्क्सचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या सत्तेला हादरा देत परिवर्तन घडवित राजेगटाने सत्ता काबीज केली. राजेगटाला नऊ व पाटील गटाला आठ जागा मिळाल्या आहेत. रासपनेही तालुक्यात खाते उघडले आहे. ढवळ, साखरवाडी, हिंगणगाव, राजाळे, मुरुम, नांदल, शिंदेवाडी, फडतरवाडी येथे सत्तांतर झाले आहे. (प्रतिनिधी)
साखरवाडीत गड आला; पण...
साखरवाडीचे सरपंचपद खुले प्रवर्गासाठी असल्याने सर्वच सत्ता आपल्या घरात पाहिजे, अशी अपेक्षा ठेवून असलेल्यांना मतदार व खुद्द राजेगटातील अंतर्गत कार्यकर्त्यांनी पाडून जागा दाखवून दिली आहे. राजेगटाची येथे सत्ता आली; पण सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असलेल्या ‘त्या’ उमेदवाराला घरी बसावे लागल्याची चर्चा साखरवाडी परिसरात होती. प्रल्हादराव पाटील यांच्या गटाकडून राजेगटाने सत्ता खेचून आणली आहे.