६३ वाहनचालकांवर कारवाई
By Admin | Updated: December 30, 2016 23:44 IST2016-12-30T23:44:07+5:302016-12-30T23:44:07+5:30
शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी : पोलिस बंदोबस्तात वाढ

६३ वाहनचालकांवर कारवाई
सातारा : थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली. वाहनांची कागदपत्रे तसेच परवाना नसलेल्या ६३ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १५ हजारांचा दंड वसूल केला.
थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी आदल्या दिवसांपासून युवकांनी तयारी केली आहे. थर्टी फर्स्ट साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलिस ठाणे, सातारा तालुका आणि शाहूपुरी पोलिसांनी आदल्या दिवसापासून खबरदारी घेतली आहे. शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेसातपासून येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर अचानक वाहनांची तपासणी सुरू केली. महाविद्यालयात येणाऱ्या अनेक मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही युवकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर काही मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना मुलाजवळ पुन्हा गाडी देऊ नका, अशी समज पोलिसांनी दिली.
सातारा तालुका पोलिसांनी दुपारी अडीचच्या सुमारास कास रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू केली. काहीजणांकडे दारूच्या बाटल्याही सापडल्या. गाडीची कागदपत्रे तपासण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनीही मोळाचा ओढा, लिंबखिंड परिसरात वाहनांची तपासणी केली. दरम्यान, शनिवारी रात्री दीडपर्यंत पोलिस शहरात येणारी वाहने आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करणार आहेत. (प्रतिनिधी)