ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६२६ अर्ज दाखल
By Admin | Updated: July 15, 2015 00:44 IST2015-07-14T23:53:15+5:302015-07-15T00:44:58+5:30
धुमशान सुरू : कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ३३९ अर्ज

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६२६ अर्ज दाखल
सातारा : जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. मंगळवारअखेर सुमारे ६२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. कऱ्हाड तालुक्यातून सर्वाधिक ३३९ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. तहसीलदार कार्यालयाबाहेर उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. सातारा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी ९, कोरेगावमध्ये ४९ ग्रामपंचायतींसाठी ४६, माणमध्ये ५७ ग्रामपंचायतींसाठी ४३, वाईमध्ये ७० ग्रामपंचायतींसाठी १४, जावळी ५६ ग्रामपंचायतींसाठी ५०, महाबळेश्वर २४ ग्रामपंचायतींसाठी ११, कऱ्हाड ९८ ग्रामपंचायतींसाठी ३३९, पाटण ९५ ग्रामपंचायतींसाठी ५७, खंडाळा ५५ ग्रामपंचायतींसाठी ३, फलटण ७८ जागांसाठी ४२, खटाव ८८ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. गावांच्या पारांवर सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने गावगप्पा चालल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. २० जुलै ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)