एक हजारात ६२३ रुग्ण मधुमेहाचे!
By Admin | Updated: November 11, 2014 00:04 IST2014-11-10T20:51:12+5:302014-11-11T00:04:11+5:30
रुग्णांना मोफत औषधोपचार करणार असल्याची माहिती नियंत्रण प्रकल्प जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ

एक हजारात ६२३ रुग्ण मधुमेहाचे!
पाटण : पाटण तालुक्यातही राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनिवारण कार्यक्रम हाती घेतला आहे. मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब व स्ट्रॉक अशा असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी रुग्णांना नाहक खर्च सहन करावा लागतो. त्याचा विचार करून शासन ग्रामीण रुग्णालय स्तरावर त्याची अंमलबजावणीची मोहीम यशस्वीपणे राबविणार आहे. रुग्णांना मोफत औषधोपचार करणार असल्याची माहिती नियंत्रण प्रकल्प जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिली. दरम्यान, त्यांनी एक हजारांमागे ६२३ रुग्ण मधुमेहाचे असतात, असे सांगितले.
पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक डॉ. प्रताप वाघमारे, डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. वीरेंद्र घड्याळे उपस्थित होते. दि. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय मधुमेह व कॅन्सर जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गावपातळीवर स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी व सेवक यांच्या माध्यमातून शिबिरे राबविण्यात येणार आहेत, असे डॉ. पोळ यांनी सांगितले.
या मोहिमेसाठी पाटण ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. घड्याळे यांची राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण प्रकल्प तालुका अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. सामान्य माणसाला उपचारासाठी लागणारा खर्च व त्यावरील उपचार न परवडणरा आहे. यासाठी या मोहिमेद्वारे शासन मोफत औषधोपचार करणार आहे. रुग्णालयासाठीचे लागणारी औषधे प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. या मोहिमेचा अतिदुर्गम ग्रामीण भागातील रुग्णांना उपयोग व्हावा, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी असे आयोजन करण्यात येणार आहे.
आहारातील अनियमितपणा, बदलती जीवनशैली यामुळे असंसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तपासणीनंतर औषध
प्रत्येकी एक हजार रुग्णांमागे मधुमेहाचा ६२३, उच्च रक्तदाबाचे १६९ तर हृदरोगाचे ३७ रुग्ण आढळून येतात. दरम्यान पाटण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासण्या करून निदान झाल्यानंतर आजाराचे गांभीर्य ओळखून त्यास योग्य तो औषधोपचार करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.