‘अजिंक्यतारा’ला ५६.४७ कोटी सहाय्य
By Admin | Updated: November 28, 2014 00:11 IST2014-11-27T22:19:43+5:302014-11-28T00:11:51+5:30
सहकार व पणन विभागाचा पुढाकार

‘अजिंक्यतारा’ला ५६.४७ कोटी सहाय्य
सातारा : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राष्ट्रवादी आमदारांच्या संस्थांचे काय होणार? असा प्रश्न पडलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्यतारा सूतगिरणीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील तीन सूतगिरण्यांना सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मंत्री एकनाथ खडसे यांची आदिशक्ती मुक्ताई सूतगिरणीस ५८.६२ कोटी, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची अजिंक्यतारा सूतगिरणीस ५६.४७ कोटी आणि आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांच्या बाबासाहेब देशमुख सूतगिरणीस ५५.०९ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सहकारी संस्थांचे काय होणार, अशी कुजबूज सुरू होती. मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून घेतलेला हा निर्णय भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘अजिंक्यतारा सूतगिरणीचा ५६ कोटी ४७ लाखांचा प्रकल्प असून, शासनाकडून सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून जवळपास दीड कोटी मिळतील. (प्रतिनिधी)