अतिवृष्टीने जावलीतील ५६१.६० हेक्टर क्षेत्र बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:43+5:302021-08-14T04:44:43+5:30
कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे ...

अतिवृष्टीने जावलीतील ५६१.६० हेक्टर क्षेत्र बाधित
कुडाळ : ‘जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावांना याची हानी पोहचली आहे. ओढ्यानाल्यांचे पात्रच बदलल्यामुळे शेतीचे बांध, ताली वाहून गेल्या. वाहून आलेल्या गाळाने शेतजमीन पुरती भरून गेली. नदी, ओढ्याकाठची शेतीच गायब झाली. यामुळे तालुक्यातील ५६१.६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यातील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांतर्गत पंचनामे झाले आहेत,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.
अस्मानी संकटामुळे जावळीतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने केळघर आणि परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभ्या भात पिकांसह शेतीच वाहून गेली. याचबरोबर रस्ते आणि महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला. पश्चिम विभागातील बामणोली भागात शेतजमीन अन् रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली.
शेतातील अनेक विहिरी गाळाने भरल्या. डोंगरावरून वाहून आलेले मोठमोठे दगड, झाडांची खोडे शेतात येऊन साचली. कधीही भरून न निघणारे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले. कोरोना काळात शेतीमध्ये केलेली सुधारणा या पुरामध्ये विरून गेली. यामुळे अनेकांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चौकट :
या परिस्थितीत येथील जनतेला पदाधिकारी, अधिकारी, विविध संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. यामुळे हळूहळू येथील जीवन पूर्वपदावर येत आहे. लोक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटातून सावरत स्वतःला सिद्ध करीत पुन्हा एकदा उभारी घेण्याची आता खरी गरज आहे.
फोटो १३कुडाळ
जावळी तालुक्यातील केळघर भागातील शेतीचे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. (छाया : विशाल जमदाडे)