पर्यटकांकडून ५५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:09+5:302021-04-25T04:39:09+5:30

महाबळेश्वर : जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व ...

55,000 fine collected from tourists | पर्यटकांकडून ५५ हजारांचा दंड वसूल

पर्यटकांकडून ५५ हजारांचा दंड वसूल

महाबळेश्वर : जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हाॅटेलवर दंडात्मक कारवाई करून ५५ हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामासाठीच जिल्ह्याची सीमा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे, परंतु सहलीसाठी जिल्हाबंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे.

मुंबईच्या पर्यटकांनी लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. त्यांनी यासाठी महाबळेश्वर येथील हाॅटेल लि मेरिडीयनमधील रूम ऑनलाइन बुक केल्या. ठरल्याप्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून महाबळेश्वरात दाखल झाले. हे पर्यटक शुक्रवारी सायंकाळी येथील नाक्यावर आले असता त्यांनी हाॅटेल बुकिंग असल्याचे सांगून शहरात प्रवेश केला.

ही माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली. त्यांनी पर्यटकांच्या शोधासाठी तातडीने पथक रवाना केले. या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडली. तर इतर दोन गाड्या हाॅटेलच्या प्रवेशद्वारावर पकडल्या. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हाबंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना सर्व हकीकत सांगितली. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार तर या पर्यटकांना हाॅटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्दल हाॅटेल व्यवस्थापनास २५ हजार रुपये दंड आकारला. या कारवाईत विशेष पथकाने ५५ हजारांचा दंड वसूल केला.

Web Title: 55,000 fine collected from tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.