५० वर्षांनंतरही नागरी सुविधांचा प्रश्न
By Admin | Updated: December 1, 2015 00:23 IST2015-11-30T21:27:06+5:302015-12-01T00:23:14+5:30
गाढवली ग्रामस्थ : कोयना धरणासाठी केळघरजवळ गावाचे पुनर्वसन

५० वर्षांनंतरही नागरी सुविधांचा प्रश्न
कुडाळ : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या गाढवली पुनर्वसन येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून चालढकल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणासाठी आपली जागा देऊनदेखील गेल्या पन्नास वर्षांत प्रशासनाने नागरी सुविधांचे प्रश्न न सोडवल्याने आम्हाला विकासापासून अजून किती काळ वंचित ठेवणार आहात? असा सवाल गाढवली पुनर्वसन येथील ग्रामस्थांनी केला आहे.
१९६२ मध्ये कोयना धरणाचे काम सुरू झाले होते. त्यावेळी तापोळा विभागातील गाढवली या गावाचे केळघरजवळ कुरळोशी गावच्या पश्चिमेस पुनर्वसन झाले होते. त्यावेळी धरणासाठी गाढवलीच्या ग्रामस्थांनी आपला जमीनजुमला, स्थावर मालमत्ता, घरेदारे यावर पाणी सोडून स्थलांतर केले होते. आज या घटनेला अनेक वर्षे झाली
आहेत.
ग्रामस्थांच्या या असीम त्यागाची गेल्या पन्नास वर्षांपासून प्रशासनाकडून बोळवण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुनर्वसित गावाला अठरा नागरी सुविधा देणे बंधनकारक असताना गाढवलीतील प्रश्नांबाबत मात्र प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. येथे पुनर्वसनाच्या अठरा नागरी सुविधांतर्गत संपूर्ण गावातील अंतर्गत रस्ते, टप्प्याटप्प्यांवर तीन मीटर उंचीच्या आरसीसी संरक्षण भिंती, स्मशानभूमी शेड बांधकाम, अंतर्गत गटारे, पिण्याच्या पाण्याची सोय ही कामे प्राधान्यक्रमाने करावीत, याबाबतचे लेखी पत्रही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कृष्णा खोरेला दिले होते. आमदारांच्या लेखी पत्राचीही दखल घेतली जात नसल्याचे गाढवलीचे उपसरपंच बबनराव शिंदे यांनी
सांगितले.
गाढवली पुनर्वसन येथे ८५ लाखांची विकासकामे प्रस्तावित असताना कृष्णा खोरेकडून वेळकाढूपणा केला जात असल्याबाबत गाढवलीच्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासकामांची पाहणी, सर्वेक्षण तसेच अंदाजपत्रक तयार करून कृष्णा खोरेचे अधिकारी गावातून गेले आहेत. मात्र, सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामे मार्गी न लागल्याने नागरी सुविधा कधी मिळणार, या प्रतीक्षेत गाढवलीचे नागरिक आहेत. (प्रतिनिधी)