५० टक्के पोलिसांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:54+5:302021-03-19T04:38:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अधिकारी आणि पोलिसांना आता लसीचा दुसरा डोस देण्यात येत ...

५० टक्के पोलिसांनी घेतली लस
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अधिकारी आणि पोलिसांना आता लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. पहिल्या डोसला पोलिसांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु दुसऱ्या डोसवेळी प्रतिसाद कमी मिळत असल्याचे पाहायला मिळते. खरं तर पोलिसांना त्यांच्या घरातूनच लस घेण्यासाठी आग्रह होतोय. ही एक महत्त्वाची जमेची बाजू आहे.
कोरोनाच्या लढाईमध्ये पोलिसांनी आपल्या छातीची ढाल करून नागरिकांची सुरक्षा केली. याच पोलिसांना आता स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस दलाने सर्वांनाच लस घेण्यासाठी सक्ती केली आहे. पहिल्या डोसवेळी जिल्हा पोलीस दलातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लस घेताना चांगला उत्साह दाखवला. २५३४ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतलाय, तर दुसरा डोस केवळ २५५ कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. काहीजणांनी दुसऱ्या डोसची तारीख चुकल्यामुळे लसीकरण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही दुसरा डोस घेऊ शकतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे असून, पोलिसांनी हा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना व्यस्त ड्युटीमुळे डोस घेता आला नाही. अशा कर्मचार्यांना घरातूनच आता लस घेण्यासाठी आग्रह होऊ लागला आहे. पोलीस हे रात्रंदिवस बाहेर असतात. अनेक लोकांशी संपर्क येत असतो. यातूनच त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. ही घरच्यांना त्यांच्या काळजी आहे. त्याचबरोबर पोलिसांकडूनही लस घेण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुसरा डोसही सर्व पोलीस घेतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
चौकट : २० टक्के पोलिसांनी घेतला दुसरा डोस
ज्याप्रमाणे कोरोनाचा पहिला डोस घेण्यासाठी पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला, तसा प्रतिसाद दुसऱ्या डोसला मिळाला नाही. केवळ २५५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही अनेकजण डोस घेणे बाकी असून, येत्या काही दिवसात हे कर्मचारी लस घेतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकटः ३० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस
जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून लस घेण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यातील काही महिला आजारी आहेत, तर काही महिलांनी वैयक्तिक कारणातून लस घेतली नसल्याचे बोलले जात आहे.
गरोदर मातांना लस दिली जात नाही. त्यामुळे पोलीस दलातील अशा महिलाही या लसीपासून वंचित राहिले आहेत. हा आकडाही मोठा असल्याचे बोलले जाते. तसेच लसीबाबत अद्यापही अनेकांचा गैरसमज दूर झाला नाही. हे एक लस न घेण्यापाठीमागचे महिला पोलिसांचे कारण असू शकते.
चौकट
जिल्ह्यात एकूण पोलीस
३३२८
लस घेतलेले अधिकारी
१३४
जिल्ह्यात एकूण पोलीस अधिकारी
१६८
लस घेतलेले पोलीस कर्मचारी
२४००