वसना योजनेसाठी हवेत ५0 कोटी

By Admin | Updated: March 10, 2016 23:48 IST2016-03-10T22:28:20+5:302016-03-10T23:48:42+5:30

कोरेगाव तालुका : आजअखेर ७० टक्के काम मार्गी; १६ वर्षांपासून योजना रखडली

50 crores in the air for the waste plan | वसना योजनेसाठी हवेत ५0 कोटी

वसना योजनेसाठी हवेत ५0 कोटी

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वसना उपसा सिंचन योजनेचे आत्तापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होण्यासाठी शासनाने ५० कोटी रुपये दिल्यास ही संपूर्ण योजना एकाच वर्षात पूर्ण होईल,असा विश्वास या योजनेच्या ठेकेदाराकडून व्यक्त होत आहे.
गेल्या १६ वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने वर्षभरातच दुसऱ्या टप्प्याचेही काम पूर्ण केले आहे. यामुळे आता तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्यातील १३ किलोमीटर नांदवळ धरणातील पाणी सोडणाऱ्या पाईपलाईनचे काम शिल्लक राहिले आहे. त्यासाठी अजून ५० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ही रक्कम तातडीने दिल्यास या योजनेचे एका वर्षातच लोकार्पण होईल, असा विश्वास या कंपनी व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे.
आजअखेर वसना उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांचे जवळपास ८० कोटी रुपयांचे काम संबंधित कंपनीने पूर्ण केले आहे. त्यापैकी कंपनीला ७८ कोटी रुपये शासनाकडून मिळालेले आहेत. तर झालेल्या कामातील अद्यापही २ कोटी रुपये शासनाकडून कंपनीला येणे आहेत. त्यापुढील कामासाठी लागणारे ५० कोटी ते ५२ कोटी रुपये मिळाल्यास १६ वर्षांपासून पाहात असलेल्या हक्काच्या पाण्याचे स्वप्न सकार होणार आहे.
वसना व वांगणा या दोन्ही पाणी योजनांचा एकत्रित भूमिपूजन समारंभ ९ मे २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नांदवळ येथे झाला होता. मात्र गेली १६ वर्षांत ज्या गतीने या योजनांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे ती कामे झाली नाहीत. त्यामुळे केवळ ७८ कोटीमध्ये पूर्णत्वास येणारी वसना सिंचन योजना आज १३० कोटींवर तर ४२ कोटी रुपयांची वांगणा उपसा सिंचन योजना १३९ कोटींवर गेली आहे.
वसना योजना उत्तर भागातील रेवडी ते नांदवळ या दरम्यान दोन टप्प्यांत कार्यरत होणार आहे. पहिल्या टप्प्यात यातील ६ गावांतील १५९८ व दुसऱ्या टप्प्यात ३२६२ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४८६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वांगणा उपसा सिंचन योजने अंतर्गत या भागातील १७ गावांतील ४२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सध्यस्थितीत या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
या योजनेच्या पूर्णत्वासाठी अजून ८० कोटींची तरतूद करण्याची गरज आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात या योजनेला केवळ ८ कोटी रुपये निधी उपलब्ध केला असल्याने ही योजना ही लांबणीवर पडणार आहे.
या दोन्ही रखडलेल्या पाणी योजनांसाठी गरज आहे ती केवळ एकत्रित निधीची. ज्या योजना केवळ १२६ कोटींमध्ये पूर्ण होणार होत्या. त्या योजनांसाठी आता २७१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
१६ वर्षे निधी व अनुशेषच्या नावाखाली रखडलेल्या पाणी योजनांचा आजपर्यंत राजकारण्यांनी मतदानासाठीच वापर करीत या योजना झुलवत ठेवण्याचाच आरोप आज येथील सर्व सामान्य जनता करीत आहे. पाण्यासाठी आसुसलेल्या शेतीला योजना पूर्ण झाल्यास दिलासा मिळेल. (वार्ताहर)

\आर्थिक वर्षात भरीव तरतुदीची अपेक्षा...
शासनाने केवळ जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य देताना गेली १६ वर्षे निधीअभावी रखडलेल्या या दोन्ही पाणी योजनांसाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात भरीव तरतूद करणे गरजेचे आहे. अन्यथा या योजनांचा खर्च पुन्हा त्या पटीत वाढणार आहे. वसना उपसा सिंचन योजना पूर्ण झाली तर शासनाने आत्ता हाती घेतलेल्या जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांना कायस्वरूपी मोठा फायदा होणार आहे.

Web Title: 50 crores in the air for the waste plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.