दर गडगडल्याने पाच एकर कोबी मातीत!

By Admin | Updated: October 6, 2015 23:41 IST2015-10-06T20:36:40+5:302015-10-06T23:41:20+5:30

तीन लाखांचे नुकसान : मलकापूर येथे उभे पीक उपटून सरीत मुजविले

5 acres of cabbage soils due to the rate! | दर गडगडल्याने पाच एकर कोबी मातीत!

दर गडगडल्याने पाच एकर कोबी मातीत!

मलकापूर : पिकांची तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ जोपासना करून बाजारपेठेत त्याचे दर ढासळले तर शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेतल्यासारखे होते. मलकापूर येथील प्रवीण पाचुंदकर या शेतकऱ्यांने काढणीयोग्य झालेले पाच एकर कोबीचे पीक दर ढासळल्यामुळे उपटून सरीत मुजविले. त्यामध्ये पाचुंदकर यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
मलकापूर येथील अशोक पाचुंदकर या शेतकऱ्याने आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. कृषी विभागात शिक्षण घेऊन त्यांचा मुलगा प्रवीण माने यांने आधुनिक शेती करण्याला पसंती दिली. तीन महिन्यांपूर्वी पाच एकर क्षेत्रात त्यांनी कोबीची लागण केली. अशा आवर्षणाच्या परिस्थितीतही वेळोवेळी औषधफवारणी व पाणी, खत घालून पिकांची चांगली जोपासना केली. कोबीचे पीक काढणीयोग्य झाल्यानंतर गेले काही दिवस कोबीचे दर चांगलेच ढासळले.
आज दर वाढेल, उद्या दर वाढेल, या आशेवर पंधरा दिवस वाट पाहिली. मात्र, दर काही वाढेना. त्यातच दसराजवळ आल्यामुळे त्याच पाच एकरात झेंडूची त्यांनी अंतर पीक म्हणून लागण केली.
हातात आलेल्या पिकाला दर नाही तर भविष्यात फायदा देणाऱ्या झेंडूंच्या पिकाला कोबीच्या पिकामुळे हानी पोहोचू लागली. अशा द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या प्रवीण पाचुंदकर या तरुण शेतकऱ्याने १० ते १५ रोजगारी लावून कोबीचे पीक आहे तसे उपटून सरीत मुजवले. त्यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कृषी विभाग किंवा तलाठ्याने पंचनामा करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)


दोन वर्षांत दोन वेळा नुकसान...
दोन वर्षांपूर्वी वडील अशोकराव पाचुंदकर यांनी चार एकर झेंडूंची लागवड केली होती. दसऱ्याला केवळ दोनच दिवस राहिले असताना वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. त्यामुळे फुलांनी लगडलेली झेंडूंची झाडे मोडली. त्यावेळीही फुलासकट झाडे काढली. दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आणि यावर्षी प्रवीणने केलेल्या कोबीचे नुकसान हे दोन वर्षांत दोन वेळा नुकसान झाले.


कोबीच्या पिकाला बऱ्यापैकी दर लागला तर एकरी ५० ते ६० हजारांचे उत्पन्न निघते. मात्र, गेल्या काही दिवसांत होलसेल बाजारात २ रुपयांपासून ते ८ रुपयांपर्यंतच किलोला दर मिळत आहे. कोबीची काढणी, भरणी व बाजारात घेऊन जाण्याची वाहतुकीचा खर्च विचारात घेतला तर सध्याचे दर नुकसानीत जातात, त्यापेक्षा होणारा खर्चच वाचवला तर बरं म्हणून कोबी उपटून मुजवला.
- प्रवीण पाचुंदकर, शेतकरी

Web Title: 5 acres of cabbage soils due to the rate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.