४५ हजार विद्यार्थ्यांच्या ‘आयुष्याची परीक्षा’
By Admin | Updated: March 2, 2016 00:56 IST2016-03-01T23:10:50+5:302016-03-02T00:56:07+5:30
‘दहावी’साठी जिल्ह्यात ११२ केंद्रे : महिनाभर चालणाऱ्या या परीक्षेत पालकांचीही लागणार कसोटी

४५ हजार विद्यार्थ्यांच्या ‘आयुष्याची परीक्षा’
सातारा : आजपासून सर्वत्र दहावीची परीक्षा सुरू झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या परीक्षेनं विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांची धडधड वाढविली आहे. जिल्ह््यातील ४५ हजार ५०३ विद्यार्थी आपल्या आयुष्याला देणारी ही परीक्षा देत आहेत. हुरहूर, धडधड अन् उत्साह असे संमिश्र भाव मंगळवारी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होते. मंगळवारी मराठी भाषेचा पेपर झाला.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे ही परीक्षा तब्बल महिनाभर चालणार आहे. त्यामुळे २९ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासाशी गाठ बांधावी लागणार आहे. अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार असला तरी त्यांना दडपणाखाली वावरावे लागणार असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे. तब्बल एक महिना चालणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचीही ‘परीक्षा’ पाहणारी ठरणार आहे.
मंगळवारी सकाळी सातारा शहरातील पंधरा परीक्षा केंद्रांवर आपला बैठक क्रमांक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आज पहिला पेपर असल्याने विद्यार्थी थोडे भांबाहून गेलेले दिसत होते. जो-तो एकमेकांना तुझा नंबर कुठे आला आहे? अभ्यास झाला आहे का? मला फारच टेन्शन आलं आहे, अशी चर्चा करताना दिसत होते.
बहुतांशी मुलांबरोबर त्यांचे पालकही आले होते. परीक्षा केंद्राबाहेर लावलेल्या फलकांवर आपल्या मुलाचा नंबर कोणत्या वर्गात आला आहे, याची शोधाशोध करत होते. तर काही पालक परीक्षेला सामोरे जाण्याऱ्या आपल्या मुलांना मानसिक आधार देताना दिसत होते.
२९ मार्चपर्यंत चालणाऱ्या परीक्षेसाठी सातारा १५, कऱ्हाड २३, पाटण १०, कोरेगाव १०, खटाव १४, खंडाळा ४, जावळी ६, फलटण १०, वाई ८, महाबळेश्वर ३, माण ९ अशा ११२ केंद्रांवर मंगळवारी दहावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली. (प्रतिनिधी)
गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके
जिल्ह्यात ११२ केंद्रांवर सुमारे ४५ हजार ५०३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण केले जात आहे. जिल्ह्यात सातारा तालुक्यातील परळी, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली व वाघाली ही तीन केंद्रे तर फलटण या केंद्रावर गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी विशेष नजर ठेवली जात आहे.
वर्ये, ता. सातारा येथील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाला कॉपी करणारा एक परीक्षार्थी सापडला. त्याचा अहवाल कोल्हापूर बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर ११२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरळीत सुरू आहे. सहा भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास कुल्लाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.