वाळू लिलावातून शासनाला मिळाला ४१ लाखांचा महसूल
By Admin | Updated: December 1, 2014 00:22 IST2014-11-30T21:04:56+5:302014-12-01T00:22:52+5:30
तहसीलदारांची माहिती : १६६ साठ्यांचे लिलाव

वाळू लिलावातून शासनाला मिळाला ४१ लाखांचा महसूल
कऱ्हाड : ‘तालुक्यातील जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये एकूण ४१ लाखांचा महसूल लिलावाच्या माध्यमातून जमा झाला,’ अशी माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली.
बेकायदा वाळूउपसा किंवा साठा केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या वतीने यापूर्वी वारंवार कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करून तहसीलदारांच्या वतीने संबंधित वाळूसाठे सील करण्यात आले होते. या वाळू साठ्यांच्या लिलावाची प्रक्रिया येथील दैत्यनिवारणी परिसरातील पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पूर्ण करण्यात आली.
या वाळू लिलाव प्रक्रियेत कऱ्हाडतालुक्यातील १६६ वाळू साठ्यांचे लिलाव झाले. त्यामध्ये १०६ साठ्यांच्या लिलावासाठी ४१ लाख इतकी बोली झाली. त्यापैकी २० लाखांची वसुली त्याचदिवशी झाली.
लिलाव बोलीपैकी एक चतुर्थांश रक्कम भरलेल्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यातून २१ लाख जमा होणार आहेत.
उर्वरित ६० वाळू साठेधारकांनी साठ्यांची रक्कम न भरल्यास परस्पर वाळूची विल्हेवाट लावल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील अथवा दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसीलदार सुधाकर भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना
दिला. (प्रतिनिधी)