वाईच्या गोशाळेत ४०० गायी
By Admin | Updated: November 16, 2015 23:59 IST2015-11-16T21:20:55+5:302015-11-16T23:59:38+5:30
करुणा मंदिर गोशाळा : गोधन सांभाळताना होतेय तारेवरची कसरत

वाईच्या गोशाळेत ४०० गायी
वाई : वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेत भाकड गायींचे प्रमाण वाढल्याने त्यांचा सांभाळ करताना व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे़ प्रत्येक गायीला दररोज चाळीस रुपयांप्रमाणे खर्च अपेक्षित असून, सध्या करुणा मंदिरात चारशेंहून जास्त गायींचे संगोपन करण्यात येते़ त्यामुळेच गोशाळेस मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
शासनाने गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु त्यामुळे वाढ झालेल्या गायींचे संगोपन करण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचण्याची गरज आहे़
शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोधन संभाळत दूग्ध व्यवसाय करण्यासाठी शासन, संस्था, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नेहमीच आवाहन करण्यात येते; परंतु गायी दूध देण्याचे बंद झाल्यानंतर भाकड गायींना सांभाळण्याची जबाबदारी शेतकरी झटकताना दिसतो. त्यामुळे अनेक वेळा भाकड गायींनी भरलेले ट्रक कत्तलखान्याकडे जाताना दुर्दैवाने दिसत आहेत़
काही संघटनांकडून त्यांना पकडून या गोशाळेत सोडण्यात येते; परंतु त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कोणीही घेताना दिसत नाही़
समाजात होणारे लहान-मोठ्या समारंभात अवास्तव खर्चाला फाटा देऊन करुण मंदिरसारख्या गोशांळाना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी या संघटनांकडून प्रबोधन करण्याची गरज आहे़
शासनाने फक्त गोवंश हत्या बंदी कायदा न करता अशा गोशाळांना अर्थिक मदत करण्याची आवश्यता आहे़ (प्रतिनिधी)
गोशाळांना गरज मदतीची
शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्याने शेतकरी वर्गातून गोशाळांना गायी दान करण्याचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे गोशांळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे़ त्यामुळे शासनाने नियोजन करून गोशाळांना अनुदान देण्याचे तरतूद करावी.
दुष्काळाची गंभीर समस्या असून, मागील दुष्काळाच्या काळाने शासनाने जनावरांसाठी छावण्या व चारा डेपो उभारले होते़ सद्य:स्थिती दुष्काळामुळे चारा टंचाई असून, गोशाळांनाच छावणी व चारा डेपोसाठी आर्थिक साह्य करावे; अन्यथा करुणा मंदिर गोशाळेत गायींचा सांभाळ करणे अवघड होईल़
- दीपक ओसवाल, विश्वस्थ, करुणा मंदिर