पुसेगाव बाजारपेठेतून यंदा ७०० ऐवजी ४० ट्रक बियाणे विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST2021-09-13T04:37:43+5:302021-09-13T04:37:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुसेगाव : एकेकाळी बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या पुसेगाव (ता. खटाव) व परिसरात दीड-दोन हजार हेक्टर ...

पुसेगाव बाजारपेठेतून यंदा ७०० ऐवजी ४० ट्रक बियाणे विक्री!
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : एकेकाळी बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या पुसेगाव (ता. खटाव) व परिसरात दीड-दोन हजार हेक्टर क्षेत्रावर होणारी बटाटा पिकाची लागवड यंदा मात्र केवळ चारशे ते पाचशे हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. ज्या बाजारपेठेतून दरवर्षी ५०० ते ७०० ट्रक बटाटा बियाणे विक्री होत होते, तेथे या वर्षी केवळ सुमारे ४० ट्रकच बियाण्याची विक्री झाली. त्यामुळे भांडवली असलेल्या बटाटा पिकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन व वाटाण्याच्या शेती क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात खेड मंचरनंतरची बटाटा बियाणे विक्री व खरेदीची खटाव तालुक्यातील पुसेगाव ही दुसरी प्रमुख बाजारपेठ आहे. पुसेगाव बाजारपेठेत त्या वेळी खात्रीशीर बटाटा बियाणे मिळत असल्याने सांगली, विटा, खानापूर, कोरेगाव, कऱ्हाड, सातारा, फलटण या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात याच बाजारपेठेतून बियाणे खरेदी करत होते. बटाटा हे तीन महिन्यांचे पीक आहे, कमी कालावधीचे आणि दसरा, दिवाळी सणाला शेतकऱ्यांना ‘नोटा’ मिळवून देणारे पीक असल्याने बऱ्याच वर्षांपासून या भागात शेतकरी बटाटा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत होते. खरीप हंगामातील इतर पिकांच्या तुलनेत बटाटा हे भांडवली पीक आहे.
बटाटा बियाणे, लागवड, खते, औषधे, आंतरमशागतीचा खर्च असा एकरी सुमारे ७० ते ८० हजार रुपये खर्च करूनही पुन्हा रोजगारी मंडळींची वानवा असल्याने आयत्या वेळी त्यांची मनधरणी करताना शेतकरी राजा पुरता मेटाकुटीला आला. खर्चाच्या तुलनेत बटाटा पिकाला चांगला भावही मिळाला नाही. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी याच बाजारपेठेतून बोगस बटाटा बियाणांची विक्री झाल्याने काही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सलग गेल्या दोन वर्षी बटाटा काढण्यावेळी व ऐरणीत बटाटा साठवून ठेवला तरीही झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा हजारो टन बटाटा जागेवरच नासून गेला, दीड-दोन वर्षांपासून कोरोनाचा गंभीर काळ असल्याने उत्पादित केलेला बटाटा विक्री करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच निसर्गाचा लहरीपणा व कोरोनाचा कहर असाच पुढे राहिल्यास अडचणीत सापडण्याऐवजी बटाटा पीकच नको, अशी धारणा शेतकऱ्यांची झाली असल्याने या वर्षी बटाटा पिकाची लागवड अत्यल्प क्षेत्रावर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बटाट्याचे क्षेत्र कमी होऊन शेतकरी बिगरभांडवली सोयाबीन पिकाकडे वळला असल्याचे दिसून येत आहे.
(कोट..)
दोन वर्षांपासून होत असलेल्या निसर्गाच्या सततच्या अवकृपेने व कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे पुसेगाव बटाटा बियाणे बाजारपेठेत होणारी कोट्यवधींची उलाढाल या वर्षी मंदावलेली आहे. दोन वर्षांपासून आर्थिक गर्तेत सापडलेला बळीराजाचा भांडवली पिकाऐवजी इतर पिके घेण्याकडे कल वाढला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या या पुसेगावच्या बटाटा खरेदी-विक्री बाजारपेठेचा रुबाब टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- संतोष तारळकर, बटाटा बियाणे विक्री व खरेदी व्यापारी, पुसेगाव
फोटो..१२पुसेगाव
पुसेगाव (ता. खटाव) येथील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतशील शेतकरी गणेश विधाते यांच्या शेतातील जोमदार बटाटा पीक. (छाया : केशव जाधव)