७८ जणांच्या आवाजासाठी ४ माईक

By Admin | Updated: June 19, 2016 00:53 IST2016-06-19T00:53:08+5:302016-06-19T00:53:08+5:30

जिल्हा परिषद : तीन आरक्षित आणि एक ओपन माईक असल्याने महिलांचा आवाज पोहोचलाच नाही

4 Mike for the sound of 78 people | ७८ जणांच्या आवाजासाठी ४ माईक

७८ जणांच्या आवाजासाठी ४ माईक

सातारा : सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येथील छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. या सभेत ६७ जिल्हा परिषद सदस्य आणि ११ पंचायत समिती सभापतींना बोलावण्यात आले होते. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात हे सभागृह भरले होते; परंतु या सर्व सदस्य आणि सभापतींसाठी फक्त चारच माईक विषय मांडण्यासाठी ठेवण्यात आले होते. प्रति लाईन तीन माईक सदस्यांनी आरक्षित केले होते. तर एक माईक सर्वांसाठी खुला होता. या परिस्थितीमुळे महिलांचा आवाज सभागृहात घुमलाच नाही.
टंचाई निवारण आणि खरीप हंगामाबरोबरच शिक्षणाविषयी सभेत चर्चा करण्यात आली. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात सदस्य आणि सभापती उपस्थित होते. जो तो आपले विषय मांडून मंजुरी घेण्यसाठी धडपडत होता; परंतु अध्यक्षांपर्यंत आवाज जाण्यासाठी माईकच उपलब्ध होत नसल्याने ‘माईक द्या’ अशी विनवणी करीत होते. उपस्थित सदस्यांसाठी केवळ चारच माईक ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक माईक बाळासाहेब भिलारे, दुसरा माईक दीपक पवार, तिसरा माईक नितीन भरगुडे-पाटील यांच्याकडे होते. तर एक माईक फिरता होता. त्यामुळे सभेमध्ये या तिघांचे विषय आधी मांडले गेले. त्यानंतर इतरांना एका माईकवर नंबरनुसार विषय मांडण्याची वेळ आली. परंतु या माईकवरही महत्त्वाच्या सदस्यांचा ताबा मिळत असल्याने इतरांना फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागत होती.
माईक मिळत नसल्याने काही सदस्य हात ऊंच करून मोठ्याने आपले विषय मांडत होते; परंतु माईकच्या आवाजामुळे त्यांचा आवाज अध्यक्षांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. दरम्यान, सभेच्या शेवटच्या क्षणी हे तिन्हीही माईक ओपन झाले. आणि इतर सदस्यांना विषय मांडण्यासाठी हाती माईक आले. माईक पुन्हा जाईल, यामुळे प्रत्येक सदस्य अध्यक्षांवर एकापेक्षा एक प्रश्नाचा सपाटा लावत होते. वेळ खूपच कमी राहिला असल्याने अनेकांनी प्रश्नांची खैरात केली; परंतु काहींना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. भागातील अनेक समस्या सोडविण्यासाठी आलेले काही सदस्य केवळ माईक उपलब्ध होत नसल्याने सभेपुढे विषय मांडू शकले नाहीत.
सभागृहात बोलणाऱ्या महिलांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. हातात माईक नसल्यामुळे महिलांना आपले मत मांडता आले नाही. हात उंचावूनही महिलांना माईकचा ताबा मिळवता आला नाही.

Web Title: 4 Mike for the sound of 78 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.