३९ महिला, ७३ पुरुष पोलिस पाटील! कऱ्हाड तालुका
By Admin | Updated: March 25, 2016 00:05 IST2016-03-24T21:37:03+5:302016-03-25T00:05:24+5:30
निवड : एकूण १७७ गावांपैकी ११८ गावांतील रिक्त पदांची निवड; ५९ गावांची निवड कधी?

३९ महिला, ७३ पुरुष पोलिस पाटील! कऱ्हाड तालुका
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात १७७ गावांत पोलिस पाटील पद भरण्यासाठी शासनाच्या वतीने परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत प्रत्यक्ष ३३५ उमेदवारांनी लेखी परीक्षा व मुलाखती दिल्या. त्यापैकी फक्त ११२ जणांची पोलिस पाटील पदे भरण्यात आली असून, उर्वरित ५९ गावांतील पोलिस पाटील पदे भरण्यात आली नाहीत. यानिवडीत ३९ महिलांची तर ७३ पुरुषांची पोलिस पाटीलपदी वर्णी लागली आहे. तर नांदगाव मध्ये एक जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. कऱ्हाड तालुक्यातील २२२ गावांपैकी १७७ गावांमध्ये पोलिस पाटील पदे भरण्यात येणार होती. या पदांसाठी शासनाच्या वतीने २२ व २३ रोजी लेखी, तोडी मुलाखती परीक्षा देखील घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी मंडलनिहायक उमेदवारांच्या परीक्षा या घेण्यात आल्या. पोलिस पाटील पदासाठी तालुक्यातील एकूण १३ मंडलातील ११८ गावांतील इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्षरितीने परीक्षा दिल्या. या परीक्षेसाठी दहावीपासून ते पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवक व युवतींसह महिलांनीही प्रयत्न केले होते. ग्रामीण भागात गावांतील तंटामुक्तीसाठी पोलिस पाटील या व्यक्तीची महत्त्वाची गरज असते. गावातील कौटुंबिक कलह, जाती-जातीतील भांडणे पोलिसांपर्यंत न नेता ती गावपातळीवर सोडविण्यासाठी व गावातील सलोखा राखण्यासाठी पोलिस पाटील या शासननियुक्त अधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यांच्याकडून गावातील सामाजिक एकता, सलोखा, व तंटामुक्त गाव राखण्याचे काम केले जाते. या उद्देशाने पोलिस पाटील पद भरले जाते. यावर्षी कऱ्हाड तालुक्यात पुरुषांबरोबर महिलांनी देखील पोलिस पाटील पदाची परीक्षा दिली. यामध्ये १७७ गावांपैकी फक्त ११८ गावांतील पोलिस पाटील पदे भरण्यात आली. उर्वरित ५९ गावांतील पदे हि रिक्त ठेवण्यात आली. या गावांतील पोलिस पाटील पदाच्या निवडी कधी केल्या जाणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील पोलिस पाटील सरळसेवा भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत ५८६ उमेदवारांपैकी ३३५ उमेदवार पात्र झाले होते. तालुक्यातील तेरा मंडलातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती या शासकीय विश्रामगृहात करण्यात आल्या. (प्रतिनिधी)