संसर्गजन्य आजाराने ३७ विद्यार्थ्यांना त्रास

By Admin | Updated: April 9, 2015 00:04 IST2015-04-08T22:52:25+5:302015-04-09T00:04:29+5:30

महाबळेश्वर येथे धावपळ : प्राथमिक शाळा क्र. ५ मधील मुलांना ताप, घसा, डोकेदुखी

37 students suffer from infectious disease | संसर्गजन्य आजाराने ३७ विद्यार्थ्यांना त्रास

संसर्गजन्य आजाराने ३७ विद्यार्थ्यांना त्रास

महाबळेश्वर : हवेतील विषाणूंचा संसर्ग होऊन येथील गणेश व दत्तनगर हौसिंग सोसायटीतील प्राथमिक शाळा क्रमांक ५ मधील इयत्ता तिसरी ते सातवीमधील ३७ मुला-मुलींना सकाळी अकरापासून ताप, घसा, डोकेदुखीचा त्रास झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. शिक्षकांनी पालकांच्या मदतीने सर्वांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार करून सायंकाळी घरी सोडण्यात आले.सकाळी शाळेत दोन - तीन मुलांना चक्कर येऊ लागली. शिक्षकांनी विचारले असता डोके व घसा दुखत असल्याचे मुलांनी सांगितले. मुलींनी ताप आल्याचे शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर पालकांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर आणखीन मुलींना त्रास जाणवू लागला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पुन्हा काही मुलींना त्रास सुरू झाला. पाहता पाहता ३० पेक्षा जास्त मुलांना त्रास झाल्याने उपचारासाठी त्यांनाही रुग्णालयात हलविले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोहित आखाडे, संदीप आखाडे, राजू शिर्के, दत्तात्रय वाडकर, शैलेश महाडिक, विनोद गोळे, नाना कदम यांनी मुलांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.
मोठ्या संख्येने विद्यार्थी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने डॉ. नितीन तडस यांनी डॉ. सारंग वाघमारे यांना तातडीने बोलावून घेतले. त्यांनी मुलांवर उपचार केले. सर्व मुलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले. तर २३ मुलांना सलाईन लावण्यात आले. इतर मुलांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. विषाणूंचा संसर्ग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पालकांना याची माहिती मिळताच घबराटीचे वातावरण पसरले होते. सर्व पालक रुग्णालयात दाखल झाले. तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, उपाध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर, प्रवीण मानकुंबरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मुलांना फळांचे वाटप केले.

Web Title: 37 students suffer from infectious disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.