पाण्यासाठी रोज मोजावे लागतायत ३६ हजार!
By Admin | Updated: April 14, 2016 23:58 IST2016-04-14T23:08:38+5:302016-04-14T23:58:08+5:30
वाठार स्टेशनमध्ये पाणीटंचाई : सहा महिन्यांत विकतच्या पाण्यावर झाला १२ लाखांचा खर्च

पाण्यासाठी रोज मोजावे लागतायत ३६ हजार!
संजय कदम -- वाठार स्टेशन -कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमुख व्यापारी पेठ असलेल्या वाठार स्टेशनला लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे शासन पाणी देत आहे. मात्र, शासनाच्या लोकसंख्येच्या चुकीच्या निकषामुळे या गावाला दररोज ३६ हजार रुपये खर्च करून विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांत पाण्यासाठी या गावाने तब्बल १२ लाख रुपये खर्च केले आहेत.वाठार स्टेशन गावची सध्याची लोकसंख्या ५ हजार ८०० एवढी आहे. या लोकसंख्ये प्रमाणे शासनाकडून या गावाला प्रतिदिन १ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. परंतु प्रत्यक्षात व्यापार, शिक्षणानिमित्त व बाहेरील गावातून या ठिकाणी वास्तव्य करत असलेले तसेच दैनंदिन कामासाठी येणारी लोकसंख्या गावच्या लोकसंख्येच्या तिप्पट असल्याने या सर्वांचा पाणीप्रश्न या ग्रामपंचायतीला सोडवावा लागत आहे. वाठार स्टेशनला तरंगत्या लोकसंख्येच्या निकषाप्रमाने दररोज ४ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात १ लाख लिटरच पाणी मिळत असल्याने हे पाणी तब्बल १८ दिवसानंतर या ग्रामस्थांना रोटेशन नुसार मिळत आहे. वाठार स्टेशन गावासाठी असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पातील विहिरीत पाणीच नसल्याने ही योजना पूर्ण बंद आहे. तर भौगोलिक परस्थितीनुसार या गावाला कोणताही हक्काचा ओढा, पाझर तलाव नाही. गावासाठी असलेल्या एकूण १२ हातपंपापैकी जवळपास ६ हातपंप बंद आहेत. यामुळे तीन हजार पाचशे लिटर क्षमतेचे १५ खासगी पाणी टॅकर गावाची पाण्याची गरज भागवत आहेत. यासाठी दररोज जवळपास ३२ हजार रुपयांचा खर्च ग्रामस्थांना करावा लागत आहे.
वाठार स्टेशन आणि खासगी पाणी टॅँकर हा सलोखा गेली कित्येक वर्षांपासून आहे. या गावाला हक्काचं मुबलक पाणी देण्याबाबत कोणलाच अद्याप अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु वाठार स्टेशनचा पाणी प्रश्न सोडवण्याचे काम विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी घेतला असल्याने आगामी वर्षभराच्या काळात वाठार स्टेशन मधील ग्रामस्थांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे.सध्याच्या परिस्थितीतून ग्रामस्थांना शासनाने आधार देऊन गावच्या तरंगत्या लोकसंख्येनुसार पाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका पार पाडावी व या गावावरील पाणी संकटातून या गावाची सुटका करावी, अशीच मागणी वाठार स्टेशन ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
सध्याच्या स्थितीत कोरेगाव तालुक्याच्या उत्तरभागात पाण्याची भीषण टंचाई आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच आढावा बैठक घेऊन पाण्याची समस्या सोडवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वाठार स्टेशनला पाणी हे तरंगत्या लोकसंख्येच्या निकषा प्रमाणेच मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे.
- रूपालीताई जाधव,
सभापती, कोरेगाव पंचायत समिती