शिवसेना कार्यकर्त्यांवरील ३५० गुन्हे कायमच

By Admin | Updated: June 12, 2015 00:46 IST2015-06-11T22:28:55+5:302015-06-12T00:46:25+5:30

शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडूनही पुरेसे अधिकार दिले जात नाहीत, अशीही तक्रार करण्यात आली

350 criminals on Shiv Sena workers will be permanently | शिवसेना कार्यकर्त्यांवरील ३५० गुन्हे कायमच

शिवसेना कार्यकर्त्यांवरील ३५० गुन्हे कायमच

सातारा : काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या आंदोलकांवर दाखल केलेल्या गुन्हे अद्याप कायम आहेत. चार महिन्यांपूर्वीच त्याबाबतचा शासन अद्यादेश निघूनही भाजपचे मंत्री जाणीवपूर्वक त्यामध्ये खोडा घालत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. विकासकामांच्या बाबतीतही डावलले जात असल्याने शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली होती.
मंत्रालयातील सचिव तसेच अन्य अधिकारी तालुक्यांपर्यंतच्या कामांचे आदेश स्वत:च्या अधिकारात तसेच आमदारांना विश्वासात न घेता काढत आहेत. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडूनही पुरेसे अधिकार दिले जात नाहीत, अशीही तक्रार करण्यात आली. दरम्यान, काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीचे शासन मागील दहा वर्षांच्या कालावधीत होते. तेव्हा शिवसैनिकांनी अनेक आंदोलने केली होती. त्यावेळच्या गुन्ह्यांमध्ये शिवसेना व भाजप या दोन पक्षांमध्ये फार मोठी तफावत होती. दहा वर्षांच्या कालावधीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सुमारे साडेचारशे गुन्हे दाखल झाले होते. चार महिन्यांपूर्वी आंदोलनात पाच लाखांच्या आतील नुकसानीचे गुन्हे काढून घेण्याबाबत शासन निर्णय झाला असूनही अद्याप साताऱ्यातील शिवसैनिकांवर दाखल असलेले गुन्हे काढून घेतले गेले नाहीत, अशी माहिती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

युवा सेना जिल्हाध्यक्षांना तडीपारीची नोटीस
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांना १० जून रोजी तडीपारीची नोटीस प्राप्त झाली आहे. पूर्वीच्या ९ गुन्ह्यांच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप शासन सत्तेत येऊनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी सुरूच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Web Title: 350 criminals on Shiv Sena workers will be permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.