तीर्थक्षेत्र पहाडी स्वच्छता अभियानात ३५ स्वयंसेवकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:11+5:302021-02-09T04:41:11+5:30
फलटण : भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा आणि फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज या शिखर ...

तीर्थक्षेत्र पहाडी स्वच्छता अभियानात ३५ स्वयंसेवकांचा सहभाग
फलटण : भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा आणि फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज या शिखर संस्थांच्या सहकार्याने सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून प्रतिवर्षी श्री सम्मेद शिखरजी तीर्थयात्रा आणि तीर्थक्षेत्र पहाडी स्वच्छता अभियान गेल्या १० वर्षांपासून राबविण्यात येते. यावर्षीही यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.
श्री सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात प्रतिवर्षी सक्रिय सहभाग घेतला जातो. जैन समाजातील युवकांची सहा जिल्ह्यांची प्राथमिक संघटना असलेल्या सन्मती सेवा दलाच्या वतीने जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिखरजी (झारखंड) येथील पार्श्वनाथ पहाडावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, सन्मती सेवा दलाच्या स्वच्छता अभियानाचे हे दहावे वर्ष आहे. यावर्षी या अभियानासाठी ३५ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. सन २०१२ पासून दरवर्षी हे अभियान राबविले जाते. आजपर्यंत यामध्ये सुमारे ११०० तरुणांनी शिखरजी पहाड स्वच्छता केली आहे. या अभियानातील प्रेरणादायी उपक्रमाबद्दल तीन वर्षांपूर्वी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने संघटनेचा सन्मान केला आहे. प्रतिवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी या कालावधीत शिखरजी अभियान राबविण्यात येत असून यामध्ये वंदना, स्वच्छता, पर्यटनाचा सहभाग आहे. सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी, माजी अध्यक्ष मयूर गांधी, वीरकुमार दोशी, महावीर दोशी, नमन गांधी, हितेश दोशी, पंकज दोशी, विनोद दोशी, शुभम शहा, राजेश दोशी, आयोजक संदेश गांधी यांच्यासह ३५ स्वयंसेवक या अभियानात कार्यरत आहेत.
०८फलटण
फोटो : श्री सम्मेद शिखर पहाड स्वच्छता अभियानात पदाधिकारी, सभासद सहभागी झाले आहेत.