तब्बल ३५ पोलिसांची धावपळ थांबणार!
By Admin | Updated: April 20, 2015 00:12 IST2015-04-19T22:19:10+5:302015-04-20T00:12:18+5:30
अतिरिक्त श्रमांची बचत : दौऱ्यावरील मंत्र्यांना मानवंदना बंद करण्याच्या निर्णयामुळे तपासासाठी अधिक वेळ

तब्बल ३५ पोलिसांची धावपळ थांबणार!
राजीव मुळ्ये - सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांना देण्यात येणारी मानवंदना यापुढे बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यामुळे याकामी गुंतणारे तब्बल चौतीस जणांचे मनुष्यबळ तपासकामाकडे वळविणे शक्य होणार असून, दोन दिवस चालणारी धावपळ थांबणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी पोलिसांकडे अद्याप लेखी स्वरूपात कोणतेही आदेश आलेले नसले, तरी लवकरच ते प्राप्त होतील. तपास आणि बंदोबस्तासाठी उपलब्ध पोलीस बळाचा वापर होत असतानाच ‘व्हीआयपी’चा दौरा येतो आणि बरेच मोठे मनुष्यबळ या दौऱ्यात गुंतून राहते. पोलिसांना दौऱ्याच्या वेळी दुहेरी भूमिका बजावावी लागते. मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री, अधिकाऱ्याला सुरक्षा देण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीपासून मनुष्यबळ पुरवावे लागते. शिवाय, जिल्ह्याच्या मुख्यालयात मानवंदना द्यावी लागते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव पातळीवरील अधिकारी तसेच महानिरीक्षक आणि त्याहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मानवंदना देण्याची पद्धत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मानवंदना देताना पोलीस बँड उपस्थित असतो. कमीत कमी १८ पोलीस कर्मचाऱ्यांची तुकडी त्यांना मानवंदना देते. सहा जणांची एक रांग अशा तीन रांगा केल्या जातात. त्यांचे नेतृत्व एक अधिकारी करतो. शिवाय, पोलीस बँडचा ताफा १६ जणांचा असतो. म्हणजेच ३४ कर्मचारी आणि एक अधिकारी केवळ मानवंदनेच्या कामी रुजून पडतात. मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या मानवंदनेला पोलीस बँड उपस्थित नसतो. केवळ एक बिगूल वाजविला जातो आणि त्यासाठी एकच कर्मचारी लागतो.
मानवंदना देण्यासाठी सराव असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक होत असली, तरी आदल्या दिवशी सराव केला जातो. याखेरीज कपड्यांना कडक इस्त्री करणे, बुटांना पॉलिश करणे या कामांतही कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. मानवंदना देताना कर्मचाऱ्यांना मुख्य बेल्टवर आणखी एक खास बेल्ट लावावा लागतो. तोही तयार आदल्या दिवशीच करून ठेवावा लागतो. ‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यावेळी होणारी एवढी सारी धावपळ या एकाच निर्णयामुळे थांबणार आहे.
व्यूहात्मक सुरक्षा कायम
मानवंदनेखेरीज ‘व्हीआयपीं’ना दर्जानुसार सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. झेड, झेड प्लस, एक्सवाय अशा दर्जांसाठी वेगवेगळे मनुष्यबळ लागते. यासाठीही कमीत कमी वीस पोलीस उपलब्ध करून द्यावे लागतात. याला ‘टॅक्टिकल सिक्युरिटी’ म्हणजेच व्यूहात्मक सुरक्षा असे म्हणतात. ही सुरक्षा यापुढेही सुरूच राहणार आहे. मात्र, मानवंदना (गार्ड आॅफ आॅनर) बंद झाल्यास किमान ३५ जणांची दोन दिवसांची धावपळ थांबणार आहे.