१२ दिवसात ३३ कोटींचे उद्दिष्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:07+5:302021-03-20T04:39:07+5:30
सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १२ दिवस उरले असून, पालिकेने कर वसुलीचा अजून निम्मा पल्लाही गाठलेला नाही. मालमत्ता ...

१२ दिवसात ३३ कोटींचे उद्दिष्ट !
सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १२ दिवस उरले असून, पालिकेने कर वसुलीचा अजून निम्मा पल्लाही गाठलेला नाही. मालमत्ता व पाणीकराचे मिळून ४४ कोटी ८६ लाख रुपये पालिकेला वसूल करावयाचे आहेत. यापैकी केवळ १२ कोटी ८ लाख ६४ हजार रुपये वसूल झाले असून, उरलेल्या दिवसात प्रशासन ३३ कोटींच्या थकबाकीचे उद्दिष्ट कसे गाठणार? हा प्रश्नच आहे.
पालिकेच्या हद्दीत तब्बल ३६ हजार मिळकती आहेत. हद्दवाढीमुळे मिळकतींमध्ये आणखी २५ हजारांची भर पडली आहे. मात्र अद्याप वाढीव भागातील मिळकतींना पालिकेची करप्रणाली लागू झालेली नाही. सद्य:स्थितीत पालिकेकडून निवासी मिळकतींची तीन तर व्यावसायिक मिळकतींची सहा रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे कर आकारणी केली जाते. पालिकेच्या वसुली विभागाने कर वसुलीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. शिवाय पालिकेच्या जप्ती पथकाकडूनही शहरात मोहीम राबविली जात आहे. जप्तीची नोटीस हातात पडल्याने काही थकबाकीदारांनी स्वत: पालिकेत येऊन कराचा भरणा केला. मात्र नागरिकांनी अद्यापही कर भरण्याकडे पाठ फिरविल्याचे वसुलीच्या आकाड्यांवरून दिसून येते.
पालिकेला एकूण ४४ कोटी ८६ लाख ६४ हजार ७३३ रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ १२ कोटी ८ लाख ६४ हजार ३२८ रुपये आजवर वसूल झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ १२ दिवस उरले आहेत. इतक्या कमी कालावधीत पालिकेला अजून ३२ कोटी ९३ लाख २८ हजार ८३१ रुपये वसूल करावे लागणार आहे. सध्या पालिकेच्या तिजोरीत दररोज २ ते ४ लाखांची भर पडत आहे. ही वसुली पाहता करवसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय वाटत आहे.
(चौकट)
पाणीपट्टीच्या थकबाकीचा विषय गंभीर
सातारा पालिकेला पाणी करापोटी तब्बल ९ कोटी ४२ लाख ९९ हजार ९३० रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी गेल्या सात ते आठ महिन्यात केवळ २ कोटी ४६ लाख ५२ हजार ८१ रुपये वसूल झाले आहेत. येत्या दहा-बारा दिवसात पाणीपट्टीची थकबाकी प्रशासन कशी वसूल करणार याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पाणी व घरपट्टी कर पालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र नागरिकांकडून कर वेळेवर भरला जात नसल्याने प्रशासन आर्थिक संकटात येऊ शकते. त्यामुळे थकबाकीदारांविरुद्ध आता प्रशासनालाच कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
लोगो : सातारा पालिकेचा फोटो