स्थायीच्या अजेंड्यावर ३१४ विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:50+5:302021-08-27T04:42:50+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला अखेर एक महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवार, दि. २७ रोजी होणाऱ्या सभेच्या ...

स्थायीच्या अजेंड्यावर ३१४ विषय
सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला अखेर एक महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवार, दि. २७ रोजी होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावर दरमंजुरीचे तब्बल ३१४ विषय घेण्यात आले आहेत. सभा ऑनलाईन होत असल्याने सर्व विषय एकमताने मंजूर होऊ शकतात.
नगरपालिकेची दि. २६ जुलैरोजी आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची सभा कोरमअभावी रद्द करावी लागली. या सभेच्या अजेंड्यावर १४३ विषय घेण्यात आले होते. आता शुक्रवारी होणाऱ्या सभेपुढे तब्बल ३१४ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले. सभा ऑनलाईन होत असल्याने यामध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता धूसर आहे. तपशीलवार माहिती देऊन सर्व विषय एकमताने मंजूर केले जाऊ शकतात. दरम्यान, ३१४ पैकी काही विषय खर्चाचा तपशील न देताच अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. या विषयांवर सभेत चर्चा होऊ शकते.
स्थायीच्या अजेंड्यावरून नगरसेविका लीना गोरे यांचे चार विषय ऐनवेळी डावलण्यात आल्याने त्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांना निवेदन दिले असून, आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत सत्ताधारी काय निर्णय घेतायत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.