स्थायीच्या सभेत ३०९ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:44+5:302021-08-28T04:43:44+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेता अशोक मोने यांनी ...

स्थायीच्या सभेत ३०९ विषय मंजूर
सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेता अशोक मोने यांनी शाहू कला मंदिर, बेंच खरेदी व आरोग्य विभागाच्या काही विषयांवर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. संबंधित अधिकाऱ्यांना याची समर्पक उत्तरे देता आली नाहीत. दरम्यान, चर्चेअंती ३१४ पैकी चार विषय रद्द व एक विषय तहकूब करून उर्वरित ३०९ विषयांना मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीची सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, महिला व बालकल्याण सभापती स्नेहा नलवडे, विरोधी पक्षनेता अशोक मोने आदींनी ऑनलाइन उपस्थिती लावली.
पालिकेच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत स्थायी समितीच्या अनेक सभा झाल्या. मात्र, शुक्रवारी झालेल्या सभेत प्रथमच कोट्यवधी रुपयांचे तब्बल ३१४ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. दुपारी चार वाजता सभेला सुरुवात झाली. प्रारंभी, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली. सभाध्यक्षांकडून अजेंड्यावरील विषयांची तपशीलवार माहिती देताना विरोधी पक्षनेता अशोक मोने यांनी नगराध्यक्ष फंडातून तरदूत करण्यात आलेले स्टील बेंच, शाहू कला मंदिराच्या नूतनीकरणावर केलेला खर्च व आरोग्य विभागाच्या काही विषयांवर आक्षेप नोंदविला. कोरोना व साथरोगांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आरोग्य अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. दरम्यान, विरोधकांनी नोंदविलेल्या आक्षेपांनंतर ३१४ पैकी ४ विषय रद्द करण्यात आले, तर एक विषय तहकूब करण्यात आला. उर्वरित ३०९ विषय सभेत मंजूर झाले.
(चौकट)
मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र
नगरविकास विभागाने नगराध्यक्षांना वित्तीय व प्रशासकीय अधिकारी दिले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष फंडातून ज्या कामांना निधीची तरतूद केली आहे अथवा जी कामे मार्गी लागली आहेत, असे विषय प्रशासकीय मंजुरीसाठी सभेपुढे ठेवणे योग्य आहे किंवा नाही, याची तातडीने माहिती द्यावी, अशा सूचना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना लेखी पत्राद्वारे केल्या आहेत.
लोगो : सातारा पालिका फोटो