सातारा : मानधनाएेवजी वेतन द्यावे, मासिक पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीस बुधवारी (दि. २५) अंगणवाड्या बंद ठेवून मुंबईतील महाआंदोलनात सामील होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्यांना टाळा लागण्याचा अंदाज आहे.मागील नऊ महिन्यांपूर्वी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी ५२ दिवस अंगणवाड्या बंद ठेवून आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य शासनाने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा अंगणवाडी संघटनांनी मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. साताऱ्यातही तीन दिवसांपूर्वी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिक सेविका संघाच्यावतीनेही जेल भरो झाला होता.तर आता अंगणवाडी कर्मचारी कृती समितच्या ठरावानुसार शासनाचा निषेध करण्यासाठी २५ सप्टेंबरला मंबईतील आझाद मैदानात महाआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीसही सहभागी होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.दरम्यान, याबाबत सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाचे सल्लागार अॅड नदीम पठाण यांनी दि. २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीसांनी अंगणवाडी बंद ठेवून मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार
By नितीन काळेल | Updated: September 23, 2024 19:01 IST