२८ बोटी पर्यटकांसाठी सज्ज

By Admin | Updated: April 15, 2016 23:28 IST2016-04-15T22:09:14+5:302016-04-15T23:28:22+5:30

महापुरुष पर्यटन सहकारी सेवा संस्थेला मान्यता : तारकर्लीत समुद्री सफारीची परवानगी

28 ready for boat tourists | २८ बोटी पर्यटकांसाठी सज्ज

२८ बोटी पर्यटकांसाठी सज्ज

मालवण : गेले अनेक दिवस सिंधुदुर्गात पर्यटकांसाठी समुद्र सफर करण्यासाठी शासन स्तरावर अधिकृत परवानगी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, अनेक परवान्यांमुळे अधिकृत परवान्यासाठी अडचणी येत होत्या. अखेर या सर्व अडचणींवर मात करीत तारकर्ली येथील महापुरुष पर्यटन सेवा सहकारी संस्थेने आपल्या २८ बोटींसाठी अधिकृतपणे समुद्र सफारीचे परवाने उपलब्ध केले आहेत.
तारकर्ली बंदर जेटी येथून पर्यटकांना समुद्रात पर्यटन सफारी करण्याचा अधिकृत परवाना जिल्हाधिकारी यांनी तारकर्ली येथील महापुरुष पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित यांना दिला आहे. या संस्थेच्या २८ बोटी अधिकृतपणे समुद्र सफारी करण्यास सज्ज झाल्या आहेत. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नुकतेच परवाने संस्थेला दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी सूर्योदयांपासून सूर्यास्तापर्यंत परवानाधारकांना पर्यटकांसाठी समुद्र सफारी करण्यास परवानगी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत रात्री पर्यटकांसाठी समुद्र सफारीस नेण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बोट चालविण्यासाठी नौकायनन शास्त्रात पारंगत असलेल्या हुशार, निर्व्यसनी, सद्वर्तनी, व्यक्तींची नेमणूक करणे परवानाधारकांवर बंधनकारक आहे. प्रशिक्षित नावाड्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस बोट, लॉँच, होडी चालविता येणार नाही. प्रत्येक बोटीवर जीव वाचविण्यासाठी लाईफ जॅकेटसारखी साधने पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावीत. जलक्रीडा उपक्रमातील बोटीतून फक्त पर्यटक किंवा प्रवासी प्रवास करणार आहेत. यामध्ये पशु, पक्षी, प्राणी व इतर माल नेता येणार नाही, अशा अनेक अटी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून घालण्यात आलेल्या आहेत. संस्थेला अधिकृत परवानगीसाठी संस्था चेअरमन रामचंद्र कुबल, व्हॉईस चेअरमन डॉ. जितेंद्र केरकर, संचालक संजय केळुसकर, मंगेश टिकम, स्नेहा केणकर, स्नेहल केळुसकर, सुहास मयेकर, भिवाजी कोळंबकर, गंगाराम खराडे, नंदू टिकम यांनी प्रशासकीय पातळीवर याचा पाठपुरावा केला. यासाठी जिल्हाधिकारी सावळकर, करमणूक शाखा अधिकारी बागायतकर, तहसीलदार वनिता पाटील यांनी सहकार्य केल्याने तारकर्ली संस्थेतर्फे त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

प्रायोगिक तत्त्वावर परवाना
महापुरुष पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित, तारकर्ली यांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंदर जेटी ते देवबाग संगम (डॉल्फीन पॉइंट) व परत तारकर्ली बंदरजेटी ते देवबाग संगम व परत तारकर्ली बंदर जेटी याठिकाणी पर्यटकांसाठी समुद्र सफारी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ३१ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्रात पर्यटन सफारीसाठी अधिकृत परवानगी दिलेली आहे.

Web Title: 28 ready for boat tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.