राज्याच्या अर्थसंकल्पात फलटणसाठी २७४ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:45+5:302021-03-19T04:38:45+5:30
फलटण : फलटण शहर व तालुक्यातील विकास कामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल२७४ कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली ...

राज्याच्या अर्थसंकल्पात फलटणसाठी २७४ कोटींची तरतूद
फलटण : फलटण शहर व तालुक्यातील विकास कामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल२७४ कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे, तर फलटण – सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून १७६ कोटींची तरतूद करण्यात आली असून यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फलटण शहर व तालुक्यातील रस्ते, पूल, प्रा. शाळा, अंगणवाडी इमारती, अन्य विकास कामे यासाठी २७४ कोटी ९८ लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना रामराजे बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांची उपस्थिती होती.
रामराजे यांनी सांगितले की, एशियन डेव्हलपमेंट बँक साहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे फलटण-सातारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण १७६ कोटी, फलटण शहरातील रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १२ कोटी, ग्रामीण भागातील विविध रस्ते पुलांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदींमधून ६३ कोटी, नाबार्ड २६ मधून ४ रस्त्यावरील पुलांसाठी ४ कोटी ९१ लाख, स्थानिक विकास निधीतून ७ कोटी ९ लाख, अर्थसंकल्पीय तरतुदी व अन्य योजनांतून जिल्हा परिषद बांधकाम विभाग ११ कोटी, दलित वस्ती सुधार योजनेतून ९८ लाख असे एकूण २७४ कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
फलटण-सातारा (आदर्की-मिरगाव-फलटण रा. मा. १४९ कि. मी. 0/00 ते २६/४००) वाठार निंबाळकर फाटा ते आदर्की फाटा (फौजी ढाबा) हा संपूर्ण रस्ता १० मीटर रुंदीने सिमेंट काँक्रिटचा करणेसाठी एशियन डेव्हलपमेंट बँक साहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून १७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नाबार्ड २६ योजनेतून फलटण-आसू- तावशी रस्त्यावर,पिंपळवाडी-फडतरवाडीरस्ता, तरडगाव-सासवड-घाडगेवाडी-माळवाडी रस्ता, पाडेगाव-रावडी-आसू रस्ता या ४ रस्त्यांवर पूल बांधणीसाठी ७ कोटी ९१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. फलटण तालुक्यातील विविध १८ रस्त्यांसाठी ६३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तालुक्यातील २१ गावातील दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी ९८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपकराव चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून १२ गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, छोटे पूल बांधकाम, भूमिगत गटार, पेव्हिंग ब्लॉक वगैरे कामे यासाठी ७ कोटी ९ लाख रुपये मंजूर आहेत.
सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील विविध कामांसाठी राज्य अर्थसंकल्पीय तरतूद व अन्य योजनांतून ११ कोटी १ लाख ३३ हजार रुपये मंजूर असून त्यामध्ये खालील कामांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून ७ लाख रुपये २ रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी मंजूर आहेत, ३०५४ मार्ग व पूल योजनेतून २ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये १३ रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
7 गावात नवीन शाळाखोल्या बांधकामासाठी ८९ लाख रुपये, १२ गावांतील शाळाखोल्या दुरुस्तीसाठी 23 लाख रुपये, ३८ गावात अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ३ कोटी 23 लाख रुपये, ३ गावातील अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी २ लाख ३३ हजार रुपये, ७ गावातील क वर्ग यात्रा स्थळांच्या ठिकाणी मंदिर व भक्त निवास परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्ते, भोजन हॉल, किचन हॉल उभारणी वगैरेसाठी ३१ लाख रुपये, १२ गावातील नागरी सुविधांसाठी ४५ लाख रुपये, ४९ गावातील जनसुविधांसाठी १ कोटी ९४ लाख रुपये, पंचायत समिती सेसमधून २२ गावातील विकास कामासाठी ४१ लाख ६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
फलटण शहरातील विविध प्रभागातील ६७ रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी अनुदान योजनेतून ११ कोटी ७९ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
**चौकट**
आमच्याकडे विकासाची दृष्टी असून त्या माध्यमातून तालुक्याचा पाणी प्रश्न, रोजगाराचा प्रश्न सोडविला आहे. शहराच्या विकासासाठी मोठी तरतूद केली असून विरोधकांनी केवळ आमच्या विकास कामाबाबत तक्रारी करण्याखेरीज काही केलेले नाही, असा टोला लगावतानाच श्रीराम आणि साखरवाडी कारखाना आम्ही चांगला चालवून पेमेंटही दिले आहे. विरोधकांच्या कारखान्यात काय चाललंय हे ते कोणालाच समजू देत नाहीत, अशी टीकाही रामराजेंनी केली.