कऱ्हाड तालुक्यात तब्बल २६ ‘ब्लॅक स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST2021-02-10T04:38:49+5:302021-02-10T04:38:49+5:30
कऱ्हाड : रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. या समितीच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर ८४ ...

कऱ्हाड तालुक्यात तब्बल २६ ‘ब्लॅक स्पॉट’
कऱ्हाड : रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. या समितीच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर ८४ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. त्यापैकी सर्वाधिक २६ ‘ब्लॅक स्पॉट’ केवळ कऱ्हाड तालुक्यात असून, या अपघाती क्षेत्रांवर अद्यापही सुरक्षात्मक उपाययोजना झालेल्या नाहीत, हे दुर्दैव.
गत आठवड्यात कऱ्हाडनजीक दोन भीषण अपघात झाले. पाचवड फाट्यावरील अपघातात तिघांचा, तर वहागाव येथील अपघातात चौघांचा बळी गेला. तत्पूर्वीही तालुक्यात लहान-मोठे अनेक अपघात झाले. त्यामध्ये काहीजणांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जायबंदी झाले. सध्या कऱ्हाड तालुक्यात हे वाढते अपघात चिंतेचा विषय ठरले आहेत. वास्तविक, रस्त्याच्या निर्माणातील त्रुटी अपघाताला कारणीभूत ठरत असल्या तरी बहुतांशवेळा चालकांचा निष्काळजीपणाच त्यांच्या जिवावर बेततो. वाहतूक नियमांचे उल्लंघन, अनियंत्रित वेग, मद्यपान, लेन कटिंग, ओव्हरटेकची गडबड यासह अन्य कारणेही अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत.
अपघाताच्या वाढत्या प्रमाणावर सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून कायमस्वरूपी आणि तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात डिसेंबर २०१८ मध्ये राज्य शासनाला आदेश दिले होते. या आदेशानुसार इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यातही रस्ता सुरक्षा समिती नेमण्यात आली. या समितीने जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्याची पाहणी केली. निरीक्षणे नोंदवली. तसेच अपघाती ठिकाणांची माहिती संकलित केली. त्यानंतर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची बैठक घेण्यात आली आणि बैठकीत अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये जिल्ह्यात ८४ ठिकाणे अपघाती म्हणून नोंदली गेली. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कऱ्हाड तालुक्यात अशा अपघाती ठिकाणांची संख्या जास्त आहे.
- चौकट
उपाययोजना नाहीत; अपघात रोखणार कसे..?
पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गासह गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग, कऱ्हाड-तासगाव मार्ग, कऱ्हाड-विटा मार्ग तसेच इतर जिल्हा मार्गांवर ही ठिकाणे आहेत. या ठिकाणी उपाययोजना करण्यासंदर्भात त्या त्या विभागांना रस्ता सुरक्षा समितीकडून सुचित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही बहुतांश ठिकाणांवर उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे अपघात रोखणार कसे, हा प्रश्न आहे.
- चौकट (फोटो : ०९केआरडी०७)
अपघातास कारण की...
१) रस्त्यावरील अडथळे
२) धोकादायक वळणे
३) चढण-उताराचा रस्ता
४) मार्गावरील खड्डे
५) वाढती रहदारी
- चौकट (फोटो : ०९केआरडी०८)
चालकांचा निष्काळजीपणा...
१) अप्रशिक्षित चालकाचा अतिआत्मविश्वास
२) मद्यप्राशन करून वाहन चालविणे
३) इंडीकेटर न लावता लेन बदलणे
४) चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’ करणे
५) महामार्गाकडेला असुरक्षितरीत्या वाहन पार्क करणे
६) वाहन नादुरुस्त झाल्यास संरक्षक उपाययोजना न करणे
७) वाहनाला रिफ्लेक्टर, रेडीअम अथवा टेललाइट नसणे
- चौकट
कऱ्हाडला ३४ बळी
महिना : अपघात : मृत्यू
डिसेंबर : ४२ : १८
जानेवारी : ३५ : १२
फेब्रुवारी : २ : ४
एकूण : ७९ : ३४
- चौकट
‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून नोंदलेली ठिकाणे
१) राष्ट्रीय महामार्ग
कोर्टी फाटा
तारळी पूल
मसूर फाटा
पेरले फाटा
वहागाव
बेलवडे फाटा
वराडे
तासवडे टोलनाका
खोडशी
गोटे
मलकापूर
नांदलापूर
पाचवड फाटा
मालखेड फाटा
वाठार फाटा
२) विटा मार्ग
हजारमाची
डुबलमळा
राजमाची वळण
सुर्ली घाट
३) कऱ्हाड शहर
बसस्थानक परिसर
कोल्हापूर नाका
४) गुहाघर-विजापूर मार्ग
अभयचीवाडी
म्होप्रे (वीटभट्टी)
५) ढेबेवाडी मार्ग
विंग हॉटेल
६) तासगाव मार्ग
कार्वे चौक
कार्वे चौकी
फोटो : ०९केआरडी०६
कॅप्शन : कऱ्हाडनजीक वहागाव येथे रविवारी झालेल्या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता.