बसअभावी प्रवाशांची २५ किलोमीटर पायपीट
By Admin | Updated: January 7, 2015 23:26 IST2015-01-07T22:59:26+5:302015-01-07T23:26:00+5:30
सत्तावीस गावांचा प्रश्न : ‘बांधकाम विभाग-एसटी’च्या आडमुठेपणामुळे ठोसेघर पठारावरील विद्यार्थ्यांचे नुकसान

बसअभावी प्रवाशांची २५ किलोमीटर पायपीट
परळी : पावसाळ्यात ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या एका बाजून वाहतूक सुरळीत सुरू आहे; परंतु बांधकाम विभागाने महिनाभर तरी या मार्गावरून वाहतूक करू नये, असे सांगितल्यामुळे बस सज्जनगड फाट्यापर्यंतच जाते. यामुळे २७ गावांतील लोकांना तेथून पुढे सुमारे २५ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे.
पावसामुळे दरीकडील बाजूचा रस्ता खचला होता. त्याचे काम सुरू आहे. मात्र एका बाजूने वाहतूक सुरू असून सहलीच्या ट्रॅव्हल्स, पवनचक्की कंपनीचे कंटेनर, इतर वाहनांची ये-जा सुरू आहे. परंतु बांधकाम विभागाने एसटी महामंडळाला येथील वाहतूक धोकादायक आहे, त्यामुळे या मार्गावरून महिनाभर तरी वाहतूक करू नये, असे लेखी पत्र दिल्याने एसटीचे अधिकारी धोका पत्करण्यास नकार देतात. वारंवार भेटून, सूचना देऊनही त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.
या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या दहा फेऱ्या होतात. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने मोरेवाडी व जांभे अशा दोन मुक्कामी बसेस जातात. दुपारच्या वेळेत सर्व बसेस सज्जनगड फाट्यापर्यंत येतात. त्यामुळे प्रवाशांना तेथून पुढे जाण्यासाठी बसची सोय नसल्यामुळे सुमारे २५ किलोमीटर चालत जावे लागते. दोन्ही विभागांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)
बांधकाम विभागाचे अजब उत्तर
या मार्गावरून इतर वाहने ये-जा करतात मग एसटी बस का येत नाही, अशी विचारणा केल्यानंतर एसटी महामंडळाच्या वाहनांचा अपघात झाल्यास ती आमची जबाबदारी असते आणि इतर वाहनांचा अपघात झाल्यास त्यात आमचा काहीही दोष नाही, असे अजब उत्तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकढून ऐकावयास मिळते.
बस चुकल्यास
स्टॅण्डवर मुक्काम
ठोसेघर पठारावरील सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात. काही जण शहरात नोकरी करतात. ते मुक्कामी बसने जातात. मात्र, काहीवेळेला मुक्कामी बस उशिरा येते. त्यामुळे अनेकांना बसस्थानकावरच मुक्काम करावा लागतो.
तहसीलदारांचे
पोकळ आश्वासन
पठारावर याच रस्त्याने मुक्कामी बसेस येतात. मग सकाळच्या का येऊ शकत नाहीत, अशी तक्रार तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी दि. ३० डिसेंबरला केली होती. त्यावेळी दोन दिवसांत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही.
बांधकाम विभागाने लेखी पत्र दिल्यामुळे आम्ही बससेवा बंद केली आहे. त्यांनी बस सुरू करण्याबाबत लेखी द्यावे, असे एसटी मंहामंडळाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे दोन्ही विभागांच्या आडमुठेपणामुळे २७ गावांतील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.
- हणमंत पवार, ग्रामस्थ