मसूरमध्ये आढळले एकाच दिवशी २१ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:22+5:302021-05-03T04:34:22+5:30
मसूर : येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रह्मपुरी आणि अष्टविनायक पेठ या ठिकाणी सरपंच पंकज ...

मसूरमध्ये आढळले एकाच दिवशी २१ कोरोनाबाधित
मसूर : येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रह्मपुरी आणि अष्टविनायक पेठ या ठिकाणी सरपंच पंकज दीक्षित व त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने रविवार, दि. २ रोजी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन तपासणी मोहीम राबविली. ९९ जणांची अँटिजेन रॅपिड तपासणी केल्यानंतर यामध्ये २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तसेच जागेवर जाऊन तपासणी केल्यामुळे साखळी तुटण्यास मदत होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, मसूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने रुग्ण सापडत असलेल्या कंन्टेन्मेंट झोन केलेल्या ब्रह्मपुरी व अष्टविनायक पेठ या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी आरोग्य केंद्राकडे केली होती. रविवार, दि.२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र डाकवे, महालॅब टेक्निशियन अश्विनी जाधव, लॅब टेक्निशियन राजेंद्र जाधव, आरोग्य सेवक विवेक देशपांडे यांच्या पथकासह मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, संग्राम जगदाळे, सुनील जगदाळे, अक्षय कोरे, माजी सरपंच प्रकाश माळी, वसंत पाटोळेे, अंगणवाडी सेविका संगीता गुरव यांनी मसूर येथे हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रह्मपुरी या ठिकाणी ५२ जणांची तपासणी केली त्यामध्ये ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर अष्टविनायक पेठ या ठिकाणी ४७ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच दिवशी २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मसूरकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. परंतु प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी केल्यामुळे साखळी तुटण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राबवलेल्या मोहिमेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.