२० तोळे दागिन्यांवर मोबाईलमुळे पाणी !
By Admin | Updated: April 15, 2016 23:35 IST2016-04-15T21:59:56+5:302016-04-15T23:35:29+5:30
पाटण : रिक्षातून पडली महागड्या ऐवजांची पर्स

२० तोळे दागिन्यांवर मोबाईलमुळे पाणी !
पाटण : कराड ते पाटण असा अॅपेरिक्षातून प्रवास करणाऱ्या सुरूल, ता. पाटण येथील एका महिलेची सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स मोबाईलवर बोलण्याच्या नादात विहे घाटादरम्यान हातातून रस्त्यात पडल्याची घटना घडली आहे. गहाळ झालेल्या पर्समध्ये जवळपास २० तोळे सोन्याचे दागिने व २० हजारांची रोकड होती. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्रात झाली आहे.सुमन नायकू संकपाळ, रा. सुरूल, ता. पाटण या सुनेसह मुंबईहून आल्या होत्या. त्या कराड ते पाटण असा अॅपेरिक्षातून प्रवास करत होत्या. दरम्यान, मोबाईलवर बोलत असताना सुमन यांच्या हातात असलेली पर्स नकळत रस्त्यात पडली. त्यानंतर मल्हारपेठनजीक प्रवास करत आल्यानंतर आपली पर्स हातातून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच अॅपेरिक्षाने पाठीमागे येऊन विहे घाटात शोधाशोध केली असता दुचाकीस्वारांनी रस्त्यातील काहीतरी उचलून नेल्याचे त्यांना
काही नागरिकांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पर्समध्ये काय होते?
गहाळ झालेल्या पर्समध्ये सोन्याचे नेकलेस, बांगड्या, मंगळसूत्र, लक्ष्मीहार असे सुमारे ५ लाखांचे दागिने होते आणि २० हजार रुपये रोकड असल्याचे सुमन संकपाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.