१९६७ च्या आठवणींनी अंगावर येतो काटा
By Admin | Updated: May 23, 2016 00:20 IST2016-05-22T22:39:17+5:302016-05-23T00:20:27+5:30
ग्रामस्थांच्या भावना : पाटणला यंदा वर्षातील सर्वात मोठा भूकंप; पाच दिवसांत तब्बल सहावेळा हादरली जमीन

१९६७ च्या आठवणींनी अंगावर येतो काटा
पाटण : पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंप सत्र सुरू आहे. बुधवारी (दि. १८) सायंकाळी ६.५३ मिनिटांनी या वर्षातील सर्वात मोठा म्हणजे ४.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा झटका कोयना विभागाला बसला. गेल्या पाच दिवसांत तब्बल सहा भूकंपाच्या झटक्यांना कोयना विभाग हादरला असून, १९६७ च्या त्या आठवणी जाग्या झाल्या असून, या आठवणींनी अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाटण तालुका हा कोयना धरण आणि पवनऊर्जेमुळे देशाच्या नकाशात कोरला गेलाय. तसाच भूकंपामुळे देखील हा तालुका ओळखला जातो. कोयना धरण परिसरात बुधवारपासून भूकंपाची मालिका जणू सुरू झाली आहे़ पाटण तालुक्यात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण वर्षातील सर्वात मोठा भूकंप हा बुधवारी झाला. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. याचा केंद्रबिंदू गोषटवाडीपासून अग्नेयस ११.२ किलोमीटर दूर आणि त्याची खोली ९ किलोमीटर होती़ यांनतर जणू भंूकपाची मालिकाच सुरू झाली़ पाटण तालुक्याने आजअखेर अनेक भूकंपाचे धक्के पचविले असले तरी बुधवार आणि गुरुवारी झालेल्या भूकंपामुळे १९६७ च्याआठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. वारंवार भूकंप होत असल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. रोज रात्री नागरिक सावधच झोपत आहेत. कधी भूकंप होईल, याची शाश्वती नाही. (प्रतिनिधी)
कोयनेत भूकंपाचा पुन्हा धक्का!
पाटण : कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका सुरूच असून, रविवारी सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला. बुधवारी सुरू झालेल्या भूकंपाची मालिका रविवारीही सुरूच होती. रविवारी बसलेला हा सातवा धक्का आहे.
कोयना धरण परिसरात पाच दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासन सुस्त असल्याची प्रचिती रविवारी आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने सकाळीच्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता, किती अंतरावर होता. किती परिसरात धक्का जाणवला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.