सातारा तालुक्यात कोरोनाच्या १७ हजार बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST2021-04-06T04:39:11+5:302021-04-06T04:39:11+5:30
सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले असून आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक ...

सातारा तालुक्यात कोरोनाच्या १७ हजार बाधितांची नोंद
सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले असून आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १७ हजारांवर रुग्णांची नोंद ही सातारा तालुक्यात झाली आहे. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. तर कऱ्हाड दुसऱ्या स्थानावर असून महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी प्रमाण आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर दररोज कोरोनाचे रुग्ण ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते. एका दिवसात हजार रुग्ण नोंद झाल्याचेही दिसून आले. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. कधी १००, २०० फार तर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून आले. मात्र, या वर्षी फेब्रुवारीपासून बाधितांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सातारा तालुक्यात नोंद होत आहेत. तर यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ६८ हजारांवर रुग्णसंख्या नोंद झाली आहे. यामधील १७ हजार कोरोना रुग्ण हे एका सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत. तर यानंतर कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या १२ हजारांवर पोहोचलीय. इतर तालुक्यांतही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामध्ये महाबळेश्वर तालुका पाठीमागे असून यामुळे प्रशासनालाही दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १ हजार ९२४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद ही सातारा तालुक्यातच झालेली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो.
चौकट :
तालुकानिहाय कोरोना नोंद आकडेवारी
तालुका बाधित मृत
सातारा - १६९८३ ४७९
कऱ्हाड - १२२७५ ३५१
फलटण - ७४३२ १७२
कोरेगाव - ६०२३ १७१
वाई - ४७३८ १५७
खटाव - ५३९७ १६०
खंडाळा - ४०९३ ७४
जावळी - ३१२१ ७०
माण - ३८०० १२६
पाटण - २६८९ १२३
महाबळेश्वर - १८८९ २७
इतर - २२३ ...
.....................................................