साताऱ्यातील १७ हॉस्पिटलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:35+5:302021-05-03T04:34:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जाऊ लागली असून, शहरातील १७ हॉस्पिटलमध्ये केवळ एक व्हेंटिलेटरचा, ...

In 17 hospitals in Satara | साताऱ्यातील १७ हॉस्पिटलमध्ये

साताऱ्यातील १७ हॉस्पिटलमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जाऊ लागली असून, शहरातील १७ हॉस्पिटलमध्ये केवळ एक व्हेंटिलेटरचा, तर विदाउट व्हेंटिलेटरचे ४३ बेड शिल्लक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात कोरोनाची किती विदारक परिस्थिती आहे, हे दिसून येत आहे.

सातारा शहरामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा कोरोनाची महाभयंकर परिस्थिती उद्भवली आहे. घरातील संपूर्ण कुटुंबे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. केवळ दोन महिन्यांमध्ये साताऱ्यात १७४७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सातारा शहरांमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जम्बो कोरोना हॉस्पिटल या दोन हॉस्पिटलशिवाय इतर १७ हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार केले जात आहेत. रविवारी या शहरातील १७ हॉस्पिटलची परिस्थिती भयानक असल्याचे समोर आले. यापैकी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये कसलाही बेड अथवा व्हेंटिलेटर बेड शिल्लक नव्हता. केवळ १७ हॉस्पिटलमध्ये मिळून एक बेड शिल्लक आहे. यावरून किती विदारक परिस्थिती सध्या शहरात झाली आहे, हे पाहायला मिळत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये १८९ बेडची क्षमता असून, या रुग्णालयामध्ये सध्या एकही बेड शिल्लक नाही. तसेच जम्बो कोविड सेंटरमध्ये २७३ बेडची क्षमता असून, यामध्ये १५ बेड शिल्लक असल्याचे समोर आले आहे. एकमेव याच हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरचा केवळ एक बेड उपलब्ध आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना आता बेड मिळणे अवघड झाले आहे. सर्वांत भीषण परिस्थिती व्हेंटिलेटर बेडची असून, केवळ एका बेडच्या जागेवर रविवारी जवळपास ५०० जणांनी प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

सातारा शहरामध्ये रोजच्या रोज कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची आकडेवारी प्रशासन देत आहे. मात्र, रविवारची आकडेवारी पाहून सातारकरांसाठी चिंतेची बाब समोर येत आहे. कोरोना रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले व्हेंटिलेटर बेड शिल्लकच नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

चौकट :

जिल्ह्याच्या बाहेर बेडसाठी धावाधाव

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सातारा शहरातच बेड शिल्लक नसल्याने अनेकांनी आता सातारा जिल्ह्याच्या बाहेर बेड शिल्लक आहेत का, याची चाचपणी सुरू केली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही बेडसाठी नातेवाइकांची धावाधाव सुरू झाली आहे. प्रचंड भीतीचे वातावरण नागरिकांमधून पाहायला मिळत आहे.

Web Title: In 17 hospitals in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.