मुदत संपूनही १५ हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:27+5:302021-09-03T04:41:27+5:30
सातारा : अलीकडे लसीकरण संथगतीने होऊ लागल्याने मुदत संपूनही तब्बल १५ हजार जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर ...

मुदत संपूनही १५ हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!
सातारा : अलीकडे लसीकरण संथगतीने होऊ लागल्याने मुदत संपूनही तब्बल १५ हजार जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच कमीतकमी २१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. पण ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. परंतु, लसीचा वारंवार होणारा तुटवडा लसीकरणाला खीळ घालत आहे. अद्यापही दुसऱ्या डोसची मुदत संपूनही तब्बल १५ लाख लोकांनी लस घेतली नाही. त्यामुळे आरोग्य विभागही काळजीत पडला आहे.
चाैकट : दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणेही आवश्यक आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रतिकारशक्ती वाढून मृत्यूचे प्रमाण घटू शकेल, यासाठी दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने मृतांची संख्या वाढत आहे. तब्बल सहा हजारांहून अधिकजणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही मृत्यूची संख्या शून्यावर आणण्यासाठी लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे.
चाैकट : नेमकी अडचण काय
लसीकरण पूर्ण होण्यासाठी खरी अडचण आहे ती लसीच्या तुटवड्याची. तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख आहे. सध्या सुरू असलेले लसीकरण जर संथगतीने होत असेल, तर या सर्वांचे लसीकरण पूर्ण होण्यास अजून दोन वर्षे लागतील. त्यामुळे लसीकरणाचा वेग तर वाढविणे गरजेचेच आहे. शिवाय लसीचा साठाही तितक्याच पटीने प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
कोट : लसीचा जादा पुरवठा होणार...
लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. मात्र, लसीचा वारंवार तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरणाने म्हणावा तसा वेग घेतला नाही. लसीची मागणी करण्यात आली आहे. जादा लसीचा साठा उपलब्ध होणार आहे.
- डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा
चाैकट : आकडेवारी
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस - १३२६५३
दुसरा डोस - ५४२४१३