सातारी फोटोग्राफीला १४० वर्षांचा इतिहास
By Admin | Updated: August 19, 2016 00:15 IST2016-08-19T00:14:15+5:302016-08-19T00:15:37+5:30
१८८० सालचे फोटो जतन : काळानुसार व्यावसायिकांनी स्वीकारला बदल; अत्याधुनिक साधनांचा वापर--वर्ल्ड फोटोग्राफी दिन विशेष

सातारी फोटोग्राफीला १४० वर्षांचा इतिहास
सातारा : साताऱ्यातील काही व्यक्तींनी १८८० च्या दशकातील त्यांच्या कुटुंबांचे त्या वेळेचे फोटो आजही जतन केलेले आहेत. यावरून सातारकरांना फोटोग्राफीची ओळख १८८० किंवा त्या मागे पुढे झाली असावी. त्यातील काही फोटोग्राफर ब्रिटिश व काही भारतीय आहेत. १९२८ मध्ये बापूसाहेब व अण्णासाहेब भिडे बंधूंनी पहिला फोटो स्टुडियो ‘किरण कला मंदिर’ या नावाने साताऱ्यामध्ये सुरू केला. यासाठी भिडे बंधूंना सातारा येथील डॉ. केळकर, सरस्वती सिनेटोन या कंपनीतील तज्ज्ञ फोटोग्राफर विनायकराव आचरेकर यांनी फोटोग्राफीचे धडे दिले.
पुढील काळात राजमाने, मराठे यांनी ही स्टुडिओ सुरू केले. यानंतर महाडिक यांनी महाडिक फोटो, दत्तात्रय भिडे यांनी प्रतिमा फोटो, मोहिते बंधूंनी गणेश फोटो, जगदीश बुटाला यांनी छाया फोटो, बाळासाहेब भुरके यांनी भुरके फोटो, बंडूशेठ काकडे यांनी राहुल फोटो, प्रकाश व जगदीश चौकवाले बंधूंनी मन्मथ फोटो स्टुडिओ सुरू केले. सुरुवातीला भिडे बंधूंनी प्लेट कॅमेराचा वापर केला. कॅमेऱ्यातील तंत्रज्ञानात सुधारणा होतच राहिल्या. याशिका, रोलीकॉर्ड यासारख्या नामवंत कंपन्यांनी डबल लेन्स रिफ्लेक्ट १२० निगेटिव्हचे कॅमेरे बाजारात आणले. हे कॅमेरे आपल्या साताऱ्यातील स्टुडियोमध्येही वापरले जाऊ लागले. त्याकाळात बुधवार पेठेतील हाजीसाहब, जोशी बंधू फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करत होते. गोवर्धन लकेरी, जोशी बंधू यांचे फोटो फिनिशिंग, ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो कलर करणे यावर प्रभुत्व होते.
१९६५ मध्ये दत्तात्रय भिडे यांनी अभयसिंह महाराज यांच्या लग्नात कलर फोटो फिल्मचा वापर केला. तो रोल डेव्हलपिंग प्रिंटिंगसाठी मुंबईला लॅबमध्ये पाठविला होता. सुरुवातीला रॉ मटेरिअलसाठी मुंबईला जावे लागत असे; पण नंतर साताऱ्यात भुरके व महाडिक यांनी ती सोय उपलब्ध करून दिली. १९७४ मध्ये भुरके फोटो स्टुडिओत सी. के. जोशी यांनी मॅन्युअल कलर फोटो प्रिंटिंग सुरू केले. १९७५ पर्यंत कॅमेरा रिपेअरिंगसाठी बाहेरून टेक्निशियन येत होते. त्यानंतर मात्र दत्तात्रय भिडे व जोशी बंधू यांनी साताऱ्यात रिपेअरिंग सुरू केले. १९७६-७७ मध्ये १३५ फिल्मरोलचा वापर सुरू झाला. यामध्ये ३६ फोटो निघत असल्यामुळे ऐन कार्यक्रमात रोल संपण्याची तारांबळ कमी झाली. १९८० मध्ये जोशी बंधूंनी १३५ कॅमेऱ्याला झूम लेन्सचा वापर सुरू केला. १९८० च्या दशकामध्ये दत्तात्रय भिडे यांनी व्हिडीओ शूटिंग सुरू केले त्या कॅमेऱ्याला झूम लेन्सचा वापर सुरू केला. कॅमेऱ्याला, कॅमेरा वेगळा व व्हीसीआर वेगळा अशी व्यवस्था होती. पुढे प्रकाश चौकवाले यांनी कॅमेरा व व्हीसीआर एकत्रित असलेला कॅमेरा आणला. त्यानंतरच्या काळात महाडिक फोटो स्टुडिओ व राहुल फोटो स्टुडिओच्या माध्यमातून साताऱ्यातील फोटोग्राफीला ग्लॅमरस स्वरूप दिले गेले. साताऱ्यातील प्रत्येक फोटोग्राफरला कलर फोटोचे डेव्हलपिंग व प्रिंटिंग हे इतर शहरातून जाऊन आणावे लागत असे. फोटोग्राफरांची ही गैरसोय शहा बंधूंनी शहा कलेक्शनच्या माध्यमातून दूर केली. साताऱ्यामध्ये पहिली कलर फोटो लॅब १९८९ मध्ये नंदकुमार गांधी यांनी ‘रॅमसन्स कलर लॅब’ या नावाने सुरू केली.
‘रॅमसन्स कलर लॅब’चे उद्घाटन लता मंगेशकर व सुनील गावस्कर यांच्या हस्ते झाले होते. १९९९ मध्ये सुहास पोरे मिमेंटो फोटो यांनी स्कॅनिंग डिजिटल फोटोग्राफी सुरू केली. १९९९ मध्येच चौकवाले कुटुंबीयांनी पद्मा फोटो स्टुडिओत डिजिटल कॅमेरा आणला व त्याची सुुरुवात दसऱ्याला अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते केली. डिजिटल कॅमेरा साताऱ्यात आला; पण त्यावेळी उपलब्ध असलेला रोलच्या कॅमेराचा वापरच जास्तीत जास्त होत होता. (प्रतिनिधी)
साताऱ्यातील फोटोग्राफी क्षेत्रामध्ये महिला फोटोग्राफर्सचा सहभाग विशेष प्रसिद्ध आहे. साताऱ्यातील फोटोग्राफी क्षेत्रामध्ये महिला फोटोग्राफर्सचा सहभाग लाक्षणिक आहे. अश्विनी भिडे, वैजयंती महाडिक, सोनिया महाडिक, प्रियंका काकडे, रोहिणी काकडे, नेहा जाधव, सुप्रिया जगदाळे, सुषमा पवार, कावेरी पवार, शिल्पा चौकवाले, वर्षा शिंदे, दीप्ती देशमुख, जयश्री चौकवाले अशा अनेक महिला फोटोग्राफर उत्तमरीत्या कार्यरत आहेत.
- योगेश चौकवाले, सातारा