३७९ धोकादायक इमारतींत १३५० नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:12+5:302021-06-04T04:29:12+5:30
सातारा : मालक व भाडेकरू या वादामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात अशा ...

३७९ धोकादायक इमारतींत १३५० नागरिक
सातारा : मालक व भाडेकरू या वादामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात अशा इमारतींची संख्या ३७९ असून, ५० इमारती बंद सध्या अवस्थेत आहे. तर उर्वरित इमारतींमध्ये सुमारे १३५० नागरिक धोका पत्करून आजही वास्तव्य करीत आहेत.
पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मिळकतदारकांना नोटिसा बजावून इमारत पाडण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र, अनेक मिळकती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने मूळ मालक याकडे दुर्लक्ष करतात. तर हक्क संपुष्टात येईल, या भीतीने भाडेकरू जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत.
घरमालक व भाडेकरू यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट असल्याने इमारत पाडता येत नसल्याचा खुलासा मिळकतदारांकडून वारंवार केला जातो. त्यामुळे नगरपालिकेला नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याने शहरातील धोकादायक इमारती संख्या यंदा ३७९ वर पोहोचली आहे. जीर्ण इमारती लोकवस्तीत तसेच रहदारीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी वाईट घटना घडल्यास याचे विपरीत परिणाम सोसावे लागणार आहेत.
(कोट)
सारे काही कळते, पण कुठे जाणार?
१. गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही या इमारतीत भाडेकरू म्हणून राहत आहोत. इमारतीची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती आम्ही करत आहोत. आमचे स्वत:चे घर नाही. त्यामुळे आमच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नाही.
- विशाल पवार, सातारा
२. आमच्या घराची अद्याप वाटणी झाली नाही. वाटणी झाली तरी नवे घर बांधण्यासाठी आर्थिक संकट उभे आहे. पालिकेने अनेकदा नोटीस बजावली. परंतु काय करणार, ही इमारत सोडली तर राहणार कुठे?
- सागर जगदाळे, सातारा
३. आमची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. पावसाळा सुरू झाला की धडकीच भरते. जसे पैसे येतील तशी इमारतीची डागडुजी केली आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली की आम्ही इमारत मोकळी करणार आहोत.
- शंकर जाधव, सातारा
(चौकट)
पालिकेने वारंवार बजावल्या नोटिसा
पालिकेकडून दरवर्षी मूळ मालकांना इमारत पाडण्याची अथवा ती खाली करण्याची नोटीस बजावली जाते. काही इमारतींवर धोक्याचा फलकही लावला जातो. मात्र, न्यायप्रविष्ट बाब असल्याने एकही मिळकतदार ही बाब गांभीर्याने घेत नाही. गेल्या १७ वर्षांत केवळ ५० मिळकतधारकांनी आपल्या इमारती स्वत:हून पाडल्या आहेत.
(चौकट)
इमारत पडल्यास जबाबदार कोण?
सातारा शहरात सहा वर्षांपूर्वी राजपथावरील धोकादायक इमारत कोसळल्याने तिघांना जीव गमवावा लागला होता. यानंतर धोकायदायक इमारतींचा प्रश्न चर्चेचा विषय बनला. पालिकेने सर्व्हे करून मिळतदारांना धोक्याची सूचना दिली; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत केवळ दोनच इमारती पाडण्यात आल्या. पावसाळ्यात जर एखादी विपरीत घटना घडली तर जबाबदार कोण? याचा नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे.
(पॉइंटर)
धोकादायक इमारत ३७९
इमारतीमध्ये राहणाऱ्यांची संख्या १३५०