‘काळ्या आई’साठी लाथाडले १३ लाख!
By Admin | Updated: November 6, 2015 23:36 IST2015-11-06T23:32:06+5:302015-11-06T23:36:46+5:30
शेतकऱ्यांचा स्वाभिमान : रस्त्यात जाणारी ऐतिहासिक विहीर वाचविण्यासाठी वनवासवाडीच्या लोखंडे कुटुंबीयांची धडपड

‘काळ्या आई’साठी लाथाडले १३ लाख!
सागर गुजर, सातारा : शेतात घाम न गाळता १३ लाखांचा चेक हातात पडत असताना काळ्या आईच्या सेवेसाठी आणि पूर्वजांची ऐतिहासिक विहीर वाचविण्यासाठी वनवासवाडीच्या कुटुंबाने तो नाकारला. चित्रपटाला शोभेल असे हे कथानक साताऱ्यात वास्तवात घडले. रोज हजारो लोकांची तहान भागविणारी महामार्गालगतची विहीर वाचावी, प्रशासनाने पैसे न देता, तिला कठडा बांधावा, अशी या शेतकरी कुटुंबाची मागणी आहे.
जलयुक्त शिवार योजना राबवून हिरवाई फुलविण्याचे प्रयत्न शासन एका बाजूला करत असताना उपलब्ध पाण्याचे स्रोत मुजविण्याचा सपाटा सहापदरीकरणाच्या कामात सुरू आहे. जमीन संपादनाची नोटीस नाही....पैसे नाहीत अन् शेतावर बुलडोझर फिरविण्याचे काम सातारा शहरालगत सुरू असल्याने महामार्गालगतचे शेतकरी व्यथित आहेत. पणजोबांच्या काळातली पाण्याने तुडुंब भरलेली विहीर वाचावी, यासाठी वनवासवाडीच्या लोखंडे कुटुंबीयांनी मात्र प्रयत्नांची शिकस्त सुरू केलीय.
सुनील लोखंडे, पांडुरंग लोखंडे, गणेश लोखंडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची बॉम्बे रेस्टॉरंटपासून हाकेच्या अंतरावर दहा एकर एकतळी शेती आहे. पाण्यासाठी महामार्गालगत दगडी बांधकाम असलेली फार पूर्वीची विहीर आहे. गेल्या पावसाळ््यात वरुणराजा रुसला तरीही या विहिरीत तुडुंब पाणीसाठा आहे. शेतात सध्या ऊस, भात पिके आहेत. पाटानं खळाळतं पाणी, गोठ्यात धष्टपुष्ट म्हशी, तसेच दोन बैल, मळणी मशीन यापेक्षा शेतकऱ्याकडं या विहिरीचं मोठं वैभव आहे. सहापदरीकरणाचे काम सुरू झाले अन् या वैभवाला नजर लागली. पांडुरंग लोखंडे आणि त्यांचे कुटुंबीय सांगत होते, ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमीन संपादनाची नोटीस दिली नाही की, या जमिनीचे पैसेही दिले नाहीत. जेसीबी आला अन् जमिनीत घुसला. काम थांबवायला गेलो तर आमच्यावरच आरेरावी सुरू झाली. शासकीय कामात अडथळा आणला, म्हणून पोलीस केस करू, असं धमकावलं जातंय! आमचा विकासाला विरोध नाही; पण रीतसर गोष्टी व्हायला हव्या होत्या. पूर्वजांनी बांधलेली विहीर वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.’
ही काळी आई...धन-धान्य देई! जोडते मनाची नाती...आमची माती, आमची माणसं, हे शीर्षकगीत अनेकजण शेतात काम करताना गुणगुणतात; पण काळ्या आईच्या सेवेसाठी देहभान विसरून राबणारे मोजकेच! सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठे उपलब्ध करून देण्यासाठी शासन एका बाजूला प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखाली सिंचनाची पूर्वीची शाश्वत व्यवस्थाच गाडून टाकत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून आमची विहीर वाचवावी, अशी मागणी लोखंडे कुटुंबीयांनी केली आहे.