बारावी परीक्षा रद्द; बारावी, अन्य प्रवेश कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:28+5:302021-06-06T04:28:28+5:30
सातारा : कोरोनामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार यावर्षी बारावीची परीक्षा रद्द झाली. परीक्षा रद्द झाल्याने आता मूल्यमापन कोणत्या पद्धतीने होणार? ...

बारावी परीक्षा रद्द; बारावी, अन्य प्रवेश कसे होणार?
सातारा : कोरोनामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार यावर्षी बारावीची परीक्षा रद्द झाली. परीक्षा रद्द झाल्याने आता मूल्यमापन कोणत्या पद्धतीने होणार? वैद्यकीय, अभियांत्रिकीसह पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश कसे होणार? असा प्रश्न बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे उभा राहिला आहे. किमान तीन-चार विषयांची अथवा ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होईल, अशी शक्यता वाटत असताना राज्य शासनाने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे पुढील परीक्षा कशा घेतल्या जाणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
परीक्षांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पयार्यांचा विचार करत होते. मे महिना संपत आला, तरी परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून पर्याय निश्चित होत नसल्याने बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावरील मानसिक तणाव कमी करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून झाली होती. कोरोनामुळे सीबीएसई बारावीची परीक्षा रद्दचा निर्णय बुधवारी झाला. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेदेखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी दुपारी जाहीर केला. त्यावर कोरोनामुळे परीक्षा रद्द केली हे ठीक आहे. मात्र, बारावीच्या मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमांच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली आहे.
प्राचार्य म्हणतात?
पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा विचार करता, बारावीच्या चार ते पाच विषयांची परीक्षा होईल, असे वाटत होते. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे धोरण शासनाने लवकर जाहीर करावे.
- राजेंद्र शेजवाळ, एलबीएस कॉलेज
परीक्षा रद्द झाल्याने आता पारंपरिक विद्या शाखांच्या प्रवेशासाठी मेरिट लावताना अडचण होणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याने त्याठिकाणी हा प्रश्न फारसा उद्भवणार नाही.
- जयेंद्र चव्हाण, कला व वाणिज्य महाविद्यालय
विद्यार्थी म्हणतात?
परीक्षा घेतली असती, तर चांगले झाले असते,.पण वाढत्या कोरोनामुळे सरकारने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकर जाहीर करून प्रक्रिया पूर्ण व्हावी.
- प्रवीण शिरतोडे, सातारा
आम्ही वर्षभर अभ्यास केला होता, पण कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली. जून महिना आला तरी परीक्षा होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती आता दूर झाली.
- ज्ञानेश्वरी पवार
पालक म्हणतात?
पूर्व परीक्षा ही अंतिम परीक्षा म्हणून घेतली असती, तर बरे झाले असते. करिअरच्यादृष्टीने बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. परीक्षा घेण्यासाठी आणखी थोडे दिवस थांबण्यास हरकत नव्हती.
- मजिद पठाण, सातारा
परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणाऱ्या हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना एकप्रकारे अन्याय होणार आहे. ऑनलाईन परीक्षा घेता आली असती. आता सरकारने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पध्दतीने व्हावे.
- सुरेखा यज्ञोपवीत, सातारा
बारावीनंतरच्या संधी
कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाने फारशी अडचण येणार नाही.
शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा पात्र होण्याची आवश्यकता आहे.
वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर प्रवेश मिळवणं सीईटमुळे शक्य होईल.
जिल्ह्यात आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण परीक्षार्थी : ४१७६६
मुलांची संख्या : २१५९६
मुलींची संख्या : २०१७०