परळी खोऱ्यात १२० हातपंप नादुरुस्त
By Admin | Updated: April 10, 2015 23:49 IST2015-04-10T21:46:18+5:302015-04-10T23:49:25+5:30
नागरिक हतबल: ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची धास्ती

परळी खोऱ्यात १२० हातपंप नादुरुस्त
परळी : शासन एकीकडे पाणीटंचाई निवारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे शासनाने लाखो रुपये खर्च करून बसविलेले हातपंप नादुरुस्त होऊन पडले आहेत.नवीन विंधन विहिरींना खर्च करण्यापेक्षा या हातपंपाची दुरुस्ती केल्यास अनेक वाड्यांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटू शकेल. एकट्या परळी, ठोसेघर भागात सुमारे १२० हातपंप नादुरुस्त स्थितीत असून, त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कुणाची? याचीच माहिती ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला नसल्याचे दिसून येते. दहा-बारा वर्षांपूर्वी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्यात आले. सुरुवातीला दोन-तीन वर्षे हे हातपंप व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर देखभाल दुरुस्ती होत नसल्याने हे पंप बंद पडले आहेत. परळी खोऱ्यातील ठोसेघर, लावंघर, करंजे, पाटेघर, कारी, निढळ, पोगरवाडी आदी भागांतील सुमारे १२० हातपंप गेले कित्येक वर्षे नादुरुस्त स्थितीत उभे आहेत. अनेक वर्षे विनावापर राहिल्याने ते गंजून गेले आहेत. त्या हातपंपाची मालकी कुणाची व दुरुस्तीची जबाबदारी कुणाची याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे हातपंपाची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. शासनच अशाप्रकारे उदासीन असेल तर हातपंपाची दुरुस्ती होणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
गावातील काही हातपंप नादुरुस्त आहेत. वारंवार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या; परंतु यावर त्यांनी कोणतीच हालचाल केली नसून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
-राकेश माने, डबेवाडी ग्रामस्थ