बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला १२ वर्षे कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल
By दत्ता यादव | Updated: March 2, 2024 20:11 IST2024-03-02T20:10:57+5:302024-03-02T20:11:43+5:30
कोरेगाव तालुक्यातील घटना

बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला १२ वर्षे कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल
दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संतोष आबासो भोईटे (वय ५२, रा. तडवळे संमत वाघोली, ता. कोरेगाव) याला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, पाच वर्षांच्या पीडित बालिकेला २८ जुलै २०१६ रोजी आरोपी संतोष भोईटे याने 'तुला चॉकलेट देतो,' असे म्हणून तिच्या हातात १० रुपयांची नोट दिली. त्यानंतर तिला एका ठिकाणी नेऊन त्याने अत्याचार केला. हा प्रकार बालिकेने आईला सांगितल्यानंतर वाठार पोलिस ठाण्यात संतोष भोईटेवर पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. निकम यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित बालिका, तिची आई, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ज्ञ तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सदर केलेला पुरावा या प्रकरणामध्ये महत्त्वाचा ठरला. घटनेवेळी पीडित बालिकेचे वय ५ वर्षांचे, तर आरोपीचे वय ४५ वर्षे होते. सध्या आरोपीचे वय ५२ आहे. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरून आरोपी संतोष भोईटे याला न्यायालयाने १२ वर्षे सश्रम कारावास तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मंजूषा तळवलकर यांनी काम पाहिले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शेळके तसेच वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी हवालदार प्रकाश चव्हाण यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार शशिकांत गोळे, पोलिस अंमलदार गजानन फरांदे, हवालदार मंजूर मणेर, हवालदार शेख, कॉन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची..
आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात शारीरिक दुखापत झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले हाेते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारली. या खटल्यात न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली.