सांगलीत सलग १२ तास नाकाबंदी
By Admin | Updated: April 22, 2015 00:26 IST2015-04-21T23:20:11+5:302015-04-22T00:26:24+5:30
पोलीसप्रमुख रस्त्यावर : वाहतूक पोलिसांकडून ३१५ वाहनधारकांवर कारवाई

सांगलीत सलग १२ तास नाकाबंदी
सांगली : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर मंगळवारपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडलीे. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी सलग १२ तास नाकाबंदी करुन तब्बल ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रीपल सीट बसून जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, परवाना नसणे याबाबत कारवाया केल्या. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. दारुच्या नशेत वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्रमांक नियमबाह्य लावणे, भरधाव वाहन चालविणे, ट्रीपल सीट जाणे, लायसन्स नसणे, मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी यापूर्वी अनेकदा कारवाई केली आहे. मात्र शे-दोनशे दंड भरुन वाहनधारक पुन्हा याच चुका करताना आढळून येतात.
यामुळे पोलीसप्रमुख सावंत यांनी वाहतूक शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सकाळी नऊपासून शहरातील विविध चौकात नाकाबंदी लावून कारवाई सुरु झाली होती. मुख्य बसस्थानक, टिळक चौक, कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन, पुष्पराज चौक, राममंदिर चौक, राजवाडा चौक, बायपास रस्ता, विश्रामबाग चौक, मार्केट यार्ड या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. मोबाईलवर बोलताना व ट्रीपल सीट बसून जाणारे अनेक वाहनधारक सापडले. पोलीसप्रमुख सावंत हे सायंकाळी या कारवाईत सहभागी झाले होते. बीट मार्शलच्या पथकास बोलावून घेऊन त्यांनाही गस्त वाढविण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)
कारवाईत ११० पोलीस
वाहतूक नियंत्रण शाखेत ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. हा सर्व स्टाफ कारवाईत सहभागी झाला होता. याशिवाय पोलीसप्रमुख सावंत यांनी मुख्यालयातील ४० कर्मचारी उपलब्ध करुन दिले होते. अशा एकूण ११० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सलग आठ दिवस ही मोहीम सुरु ठेवणार आहे. दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे अनेक वाहनधारक सापडले आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.