वाई तालुक्यात मे महिन्यात ११४४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:21+5:302021-05-11T04:41:21+5:30
वाई : वाई तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून, अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडिसिविर इंजेक्शनची कमी जाणवत असून, ...

वाई तालुक्यात मे महिन्यात ११४४ रुग्ण
वाई : वाई तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून, अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडिसिविर इंजेक्शनची कमी जाणवत असून, उपलब्ध रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होताना दिसत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे सामान्य माणसाला आर्थिक अडचणीमुळे उपचार करणे कठीण झाले आहे.
१ एप्रिलनंतर राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट असून, परिस्थिती हाताबाहेर जाते काय, अशी परिस्थिती आहे. वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही लक्षणीय वाढत आहे, तसेच राज्यात काही जिल्ह्यांत कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
वाई तालुक्यात एप्रिलमध्ये ३,५४२ रुग्ण सापडले, तर मेच्या दहा दिवसांत ११४० रुग्ण सापडले अलीकडच्या चार दिवसांत शंभरच्या आसपास आकडेवारी येत असल्याने काहीशी समाधानकारक परिस्थिती आहे. राज्यासह देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली. वाई शहरातून विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. रोज शहराच्या मुख्य चौकात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात असून, आतापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या दोनशेहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली.
तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी केले आहे.
चौकट..
आतापर्यंत सहाशेहून अधिक नागरिकांचे लसीकरण
लसीकरणाचा पहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. आतापर्यंत वाई तालुक्यात ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे २२ हजारांवर लसीकरण झाले असून, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाले असून, आतापर्यंत सहाशेहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ अभियान चालू केले आहे.