किरकोळ कामांसाठी शंभरांचा मुद्रांक!
By Admin | Updated: January 23, 2015 00:39 IST2015-01-22T23:52:04+5:302015-01-23T00:39:09+5:30
छपाई बंद : दहा, वीस, पन्नास रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा

किरकोळ कामांसाठी शंभरांचा मुद्रांक!
सातारा : मागील दोन महिन्यांपासून छपाई बंद झाल्याने कोषागार कार्यालयात दहा, वीस, पन्नास रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे किरकोळ कामांसाठीही आता शंभर रुपयांच्याच मुद्रांकाचा वापर करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.ना हरकत दाखला, संमती पत्र, प्रतिज्ञा पत्रासह विविध दाखल्यांसाठी वीस रुपयांच्या मुद्रांकाचा वापर केला जातो. परंतु, मागील दोन महिन्यांपासून सातारा तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्यांकडे मुद्रांकांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय कामासाठी शंभर रुपयांचा मुद्रांक वापरला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालय परिसरात मुद्रांक मिळत नाही, हे समजल्यावर पैसे वाचविण्यासाठी काही ग्राहक न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच इतर खासगी विक्रेत्यांकडे जाऊन चौकशी करत आहेत. त्यातून काहीना त्यांना हवे ते मुद्रांक विकत घेत आहेत. मुंबई येथील कोषागार कार्यालयातूनच दहा, वीस, पन्नास रुपयांच्या मुद्रांकांची छपाई बंद केल्यामुळे येथील कोषागार कार्यालयात फक्त शंभर रुपयांचे मुद्रांक मिळत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर काही मुद्रांक विक्रेत्यांनी दिली.यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावून शासनाच्या तिजोरीत भरणा होत असला तरी किरकोळ कामासाठी शंभर रुपयांचा वापर हा सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेर गेला आहे. तरी संबंधित विभागाने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन दहा, वीस, पन्नास रुपयांचे मुद्रांक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
मुद्रांकाची गरज नाही
दोन दिवसांपासून सोशल मिडियावर महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग यांचा एक मेसेज फिरत आहे. त्यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचेसमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केल्याचे नमूद केले आहे.