पोलीस दलातील १० अधिकारी-कर्मचारी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:54+5:302021-04-04T04:40:54+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असून, कोरोनाने सातारा पोलीस दलात शिरकाव केला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी आशा ...

पोलीस दलातील १० अधिकारी-कर्मचारी बाधित
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असून, कोरोनाने सातारा पोलीस दलात शिरकाव केला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी आशा दहाजणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यासाठी पुन्हा पोलीस कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. फ्रंटलाईन असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही बाधित झाले होते. या पोलिसांच्या उपचारांसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयाच्या उपचारांसाठी पोलीस परेड ग्राउंड येथे पोलीस कोरोना सेंटर उभारले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ते पुन्हा बंद करण्यात आले होते. मात्र, शनिवारी या कोरोनाने पुन्हा पोलीस दलात शिरकाव केला असून, पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस दलाकडून सतर्कता घेण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस अधिकारी बाधित येऊ लागल्याने या बाधित पोलिसांना चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तत्काळ पोलीस कोरोना सेंटर सुरू केले आहे. यातून बाधित होणाऱ्या पोलीस दलाच्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगले आणि तत्काळ उपचार मिळावेत यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बन्सल यांनी सांगितले.